पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला २७ जणांना चावा; महापालिका झोपेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:11 PM2019-10-07T12:11:33+5:302019-10-07T12:11:43+5:30
पिसाळलेल्या कुत्र्याने तीन वर्षांच्या चिमुकल्यासह २७ जणांचे लचके तोडल्यानंतरही महापालिकेचा कोंडवाडा विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याची परिस्थिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील अकोट फैल परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत तब्बल २७ जणांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने तीन वर्षांच्या चिमुकल्यासह २७ जणांचे लचके तोडल्यानंतरही महापालिकेचा कोंडवाडा विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याची परिस्थिती आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहराच्या गल्लीबोळात मोकाट कुत्रे व डुकरांनी अक्षरश: उच्छाद मांडल्याची परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी भटके कुत्रे व डुकरांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरातील लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शाळकरी मुले व वयोवृद्ध नागरिकांना फिरणे अवघड झाले आहे. मोकाट गुरेढोरे, कुत्रे व डुकरांच्या उच्छादामुळे सर्वसामान्य अकोलेकरांच्या जीविताला धोका निर्माण झाला असताना महापालिका प्रशासन बघ्याच्या भूमिकेत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रभाग क्रमांक दोनमधील अकोट फैल, शंकर नगर, मेहमुद नगर, मौलाना अब्दुल कलाम चौक परिसरात मागील सात दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याने सात दिवसांच्या कालावधीत ११ आणि रविवारी तब्बल १६ जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. यामध्ये लहान मुलांचा सर्वाधिक समावेश असून, काही पुरुष व महिलासुद्धा जखमी झाल्या आहेत. लहान मुलांच्या मानेजवळ, खांद्याला, हाताला तसेच पाठीला चावा घेण्यात आल्याचे चित्र रविवारी सर्वोपचार रुग्णालयात पाहावयास मिळाले.
या घटनेमुळे सर्वोपचार रुग्णालयात जखमी व त्यांच्या नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने जखमी आल्यामुळे रेबिजची लस देताना सर्वोपचारमधील यंत्रणेची तारांबळ उडाली होती.