भाजपा शतप्रतिशत दक्ष!

By admin | Published: July 11, 2017 01:10 AM2017-07-11T01:10:12+5:302017-07-11T01:10:12+5:30

संघटना पातळीवर मोर्चेबांधणीमध्ये भाजपा अग्रेसर

BJP is 100 percent skilled! | भाजपा शतप्रतिशत दक्ष!

भाजपा शतप्रतिशत दक्ष!

Next

राजेश शेगोकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मध्यावधीच्या शंकेने सारेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीच मध्यावधीची शक्यता फेटाळून लावल्याने निवडणुकीचे नगारे वाजायचे थांबले असले तरी भाजपाने आपली तयारी कायम ठेवली असल्याचे संकेत त्यांच्या पक्ष संघटनेतील भरगच्च कार्यक्रमांमधून स्पष्ट होत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांच्या राज्य गुप्त वार्ता विभागाकडूनही राज्य सरकारने विविध मतदारसंघातील स्थितीचा अंदाज घेण्यात आल्याची विश्वसनीय माहिती समोर आल्याने भाजपाने एक प्रकारे निवडणुकीसाठी कार्यकर्त्याना ‘अलर्ट’ केल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजपाने यापुढे शतप्रतिशत सत्तेत येण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महतप्रयासाने केंद्रात व राज्यात आलेली सत्ता आता गमावायची नाही असा चंग या पक्षाने बांधला असल्यामुळेच जिल्ह्यातील १ हजार २८८ ‘मतदान केंद्र ’ मजबूत करीत निवडणुकीची तयारी सुरू केली. सोबतच विस्तारक ही संकल्पना राबविली, सबका साथ सबका विकास मेळावा घेऊन शासनाच्या योजना लोकांपर्यत पोहचविण्याचा धडाका लावला आहे. अकोल्याच्या पक्षतपातळीवर खासदार संजय धोत्रे यांचा गट अतिशय सक्रिय होत संघटनेवर पकड निर्माण करीत असून दुसरीकडे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनीही विविध कार्यक्रमांतून सक्रियता वाढविली असल्याने या दोन्ही गटाचे प्रयत्न भाजपा चर्चेत राहील असेच आहेत.
अकोल्याच्या सारीपाटावर सध्या भाजपाला सर्वार्थाने ‘अच्छे दिन’ आहेत. नगरपालिका, महापलिका जिंकत आपला जनाधार केवळ मजबूतच केला नाही तर विरोधकांना नेस्तानाबूत करण्यात भाजपाने यश मिळविले आहे. त्यामुळेच आजच्या घडीला भाजपाला आव्हान देण्याचे त्राण विरोधकांमध्ये उरले नाही अशी स्थिती आहे. गेल्या दीड दशकापासून ताब्यात असलेल्या लोकसभा मतदारसंघात खासदार संजय धोत्रे यांचा सामना करण्यासाठी काँग्रेस सारख्या सर्वात जुन्या पक्षाकडे सध्याच्या स्थितीत प्रबळ उमेदवार नाहीत, राष्ट्रवादीसोबत युती झाल्यास दोन्ही पक्षांना चालणारा उमेदवार कोण? हा प्रश्नच आहे तसेच सेना स्वतंत्र लढल्यास त्यांनाही उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे केवळ भारिप-बमसंचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे भाजपाला आव्हान देणारे सध्या तगडे उमेदवार आहेत. विधानसभा मतदारसंघातील आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर यांनी आपला मतदारसंघ पक्का बांधून ठेवला आहे तर मूर्तिजापुरमध्ये पक्षाच्या दोन गटांमधील वादाचा फटका भाजपाला बसण्याची चिन्हे आहेत. अकोट मतदासंघामध्ये भाजपाने नगरपालिका जिंकल्या असल्या तरी विधानसभेसाठी भाजपाची स्थिती हुकमी एक्कासारखी नक्कीच नाही व बाळापूर या निवडणुकीत भाजपाने आव्हान म्हणून स्वीकारले आहे. कुठल्याही स्थितीत शतप्रतिशत भाजपा हे ब्रीद पुढील निवडणुकांमध्ये जिल्ह्यात प्रत्यक्षात आले पाहिजे यासाठी पक्ष संघटना कामाला लागली आहे.
भाजपने १ हजार २८८ बुथ प्रमुखांची तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या दहा कार्यकर्त्यांची यादी तयार केली, त्यांना प्रशिक्षित केले विशेष म्हणजे याची सुरवात बाळापूर मतदारसंघातील ३०६ बूथ प्रमुखांच्या नियुक्तीपासून झाली होती. अकोला लोकसभा मतदारसंघात १०० टक्के बुथ प्रमुखांच्या निवडीसह प्रत्यक्ष निवडणुकीसाठी १७ हजार कार्यकर्त्यांची फौज भाजप उभी करीत आहे. दीड दशकापूर्वी भाजपाला अनेक बुथवर कार्यकर्तेही मिळत नव्हते आता मात्र सर्व बुथ समित्या तयार आहेत यावरून निवडणुकीसाठी ‘रूट लेव्हल’ चे नियोजन झाले आहे हे स्पष्ट होते. यासोबतच भाजप जिल्ह्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजनेअंतर्गत ग्रामीण भागात १६० तर अकोला महारानगरात ४० विस्तारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यविस्तार योजनेच्या माध्ममातून नेमलेले २०० विस्तारकांनी २९ मे ते १२ जून या कालावधीत सरकारची यशोगाथा लोकांपर्यत पोहचविली व आता सहा विस्तारकांनी पुढील सहा महिन्यासाठी निवडणुकीच्या कामाला वाहून घेतले आहे. ही पक्ष बांधणी केवळ लोकसभा, विधानसभा निवडणुकांपुरतीच नाही तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्येही भाजपाने स्वबळावरच जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची व्यूहरचना आखली आहे.
भाजपाची राजकीय ताकद अतिशय दमदार असली तरी या पक्षामध्ये पालकमंत्री व खासदार गटामध्ये असलेले राजकीय द्वंद पक्षाच्या एकसंघतेवर प्रश्न उपस्थित करीत आहे.
अर्थात या दोन गटाचा भाजपाच्या निवडणूक निकालावर आतापर्यंत काही परिणाम झाला नाही मात्र भविष्यात होणारच नाही याची शाश्वती कोण देणार ? दुसरीकडे भाजपाची सगळी लिडरशिप ही ‘मराठा कॅडर’ या स्वरूपाची होत असल्याने पक्ष संघटनेतील पदांवर ओबीसी प्रवर्गातील नेत्यांना संधी देण्याची गरज आहे. श्रावण इंगळे यांच्या रूपाने बहुजन चेहरा सध्या भाजपासमोर करीत असले तरी तेवढे पुरेसे नाही त्यामुळे बहुजन-ओबीसी पदाधिकाऱ्यांनाही पक्ष संघटनेत संधी देण्याची गरज कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

पदाधिकाऱ्यांचा लेखाजोखा
निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने सर्वच मतदारसंघात कार्यविस्तारकांच्या माध्यमातून निवडणुकीची चाचपणी केली असून दुसरीकडे पक्ष बांधणीसाठी नेमलेल्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचा लेखाजोखा ‘नागपूर’ वरून त्रयस्थांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पक्ष संघटनेत फेरबदल दिसून आल्यास आश्चर्य वाटायला नको अशी स्थिती आहे.

Web Title: BJP is 100 percent skilled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.