शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपाचा उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 10:38 AM2020-11-10T10:38:19+5:302020-11-10T10:38:33+5:30
Teacher constituency elections शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पूर्णपणे राजकीयच हाेण्याचे संकेत आहेत.
- राजेश शेगाेकार
अकोला: विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघांची निवडणूक ही शिक्षक संघटनांमधील स्पर्धेतून रंगत असते. राजकीय पक्ष छुपा पाठिंबा देऊन उमेदवारांमधील चुरस वाढवत असते. यावेळी मात्र थेट राजकीय पक्षांनीच रिंगणात उडी घेतली आहे. भाजपाने उमदेवार जाहीर करून रणशिंग फुंकले असून, महाविकास आघाडीमधील शिवसेनाही स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी करत आहे, त्यामुळे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पूर्णपणे राजकीयच हाेण्याचे संकेत आहेत.
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या प्रतिनिधीचा सहा वर्षांचा कार्यकाळ १९ जुलै रोजी संपला; मात्र काेराेनाच्या उद्रेकामुळे निवडणूक आयोगामार्फत निवडणुकीची तारीख निश्चित केली जात नव्हती. ती आता जाहीर झाली असून, येत्या १ डिसेंबर राेजी निवडणूक हाेत आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीने प्रा. नितीन धांडे यांना उमेदवारी देत थेट रिंगणात उतरवले आहे. या पूर्वी भाजपाने अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात भाजपाने थेट उमदेवार देत या मतदारसंघावरील शिक्षक संघटनांचा प्रभाव संपुष्टात आणला हाेता. ताेच कित्ता शिक्षक मतदारसंघात गिरविण्यासाठी भाजपा रणनीती आखत आहे. गेल्या निवडणुकीत काॅंग्रेसने अधिकृत उमेदवारी देऊन मतदारसंघाची निवडणूक राजकीय करण्याचा प्रयत्न केला हाेता; मात्र काॅंग्रेसला यश आले नाही, त्यामुळे आता भाजपाच्या उमेदवाराकडे लक्ष राहणार आहे.
विद्यमान आमदार देशपांडे यांच्या अडचणी वाढल्या
गेल्यावेळी आमदार श्रीकांत देशपांडे यांना भाजापा-शिवसेनेने समर्थन दिले हाेते. यावेळी महाविकास आघाडीमध्ये अमरावतीची जागा शिवसेनेसाठी साेडण्यात आल्याची माहिती आहे. मूळचे शिवसैनिक असूनही आ. देशपांडे यांच्या ऐवजी शिवसेना स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी करत असून, एका उमेदवाराबाबत दाेन दिवसात निर्णय हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आमदार देशपांडे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.
शिक्षक संघटनाचे उमेदवारही तयारीत
निवडणुकीसाठी राज्य शिक्षक परिषद, शिक्षक आघाडी, शिक्षक महासंघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना, विदर्भ ज्युनिअर टिचर्स असोसिएशन (विजुक्टा), भाजप शिक्षक सेल, विभागीय शिक्षक संघ, शिक्षक सेना, खासगी शिक्षक संघटना आदींनी शिक्षक मतदारांची नोंदणी केली आहे. विद्यामान आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यासह अकोल्याचे प्रा. डॉ. अविनाश बोेरडे, विकास सावरकर, वाशिमचे ॲड. किरण सरनाईक, राजकुमार बोनकिले, अमरावतीचे संगीता शिंदे, शेखर भोयर, प्रकाश काळबांडे, यवतमाळचे डॉ. नितीन खर्चे, बुलडाण्याचे डाॅ. नीलेश गावंडे आदींनी तयारी सुरू केली आहे.