अकोला मनपात सत्ताधारी भाजपाची वर्षपूर्ती; वर्षभरात ३०३ कोटींच्या विकास कामांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:33 PM2018-03-09T13:33:33+5:302018-03-09T13:33:33+5:30
अकोला:महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोलेकरांनी पहिल्यांदाच भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवून देत भाजपाचा मनपातील सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला. ९ मार्च २०१८ रोजी सत्ताधाºयांच्या कामकाजाला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे.
आशिष गावंडे
अकोला:महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोलेकरांनी पहिल्यांदाच भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवून देत भाजपाचा मनपातील सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला. ९ मार्च २०१८ रोजी सत्ताधाºयांच्या कामकाजाला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. या वर्षभराच्या कालावधीत ३०३ कोटी रुपयांतून विकास कामे सुरळीत केल्याचा दावा महापौर विजय अग्रवाल यांनी केला आहे. मागील वर्षभरात मोठी विकास कामे तर सोडाच प्रभागात साध्या मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यात सत्ताधारी पक्ष सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करीत विरोधी पक्ष काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भारिप-बमसंने सत्ताधाºयांवर हल्लाबोल चढवला आहे.
२०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदी लाटेत सर्वच राजकीय पक्षांची पुरती दाणादाण उडाली होती. केंद्रात एकहाती सत्ता दिल्यास ‘अच्छे दिन’ नक्कीच येणार, असा दुर्दम्य विश्वास भाजपाने व्यक्त केला होता. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा व त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपाने जोरदार मुसंडी मारली. फेब्रुवारी २०१७ मध्ये मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत भाजप लोकप्रतिनिधींनी शहरात विकास कामांचा धडका लावल्याचे चित्र होते. त्याचे फळही भाजपाला चाखायला मिळाले, यात तसूभरही शंका नाही. ८० जागांपैकी भाजपाने तब्बल ४८ जागांवर विजय मिळवला. भाजपाची गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता असल्यामुळे साहजिकच अकोलेकरांच्या अपेक्षा उंचावल्या. ९ मार्च २०१८ रोजी मनपातील सत्ताधाºयांना एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या कालावधीत भाजपाने प्रलंबित विकास कामे निकाली काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भारिप- बमसंने मात्र वर्षभरात प्रभागातील मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचा आरोप करीत सत्ताधाºयांनी अकोलेकरांचा विश्वासघात केल्याचा हल्लाबोल चढविला आहे.
या कामांचा समावेश
शहरात ३०३ कोटींची कामे रुळावर असल्याचा दावा सत्ताधारी भाजपाने केला आहे. यामध्ये विविध रस्ते-३० कोटी, एलईडी पथदिवे- २० कोटी, वैयक्तिक शौचालय बांधकाम- २० कोटी, पाणी पुरवठा दुरुस्ती-१८ कोटी, सांस्कृतिक भवन -१५ कोटी, रमाई घरकुल योजना-२२ कोटी, प्रधानमंत्री आवास योजना- ५२ कोटी, मनपाची प्रशासकीय इमारत-१६ कोटी, ‘अमृत’अंतर्गत पाणी पुरवठा योजना टप्पा क्र.१-११० कोटींच्या कामांचा समावेश आहे.
४७५ कोटींची कामे प्रस्तावित
‘अमृत’अंतर्गत पाणी पुरवठा योजना टप्पा क्र.२-२५० कोटी रुपये, ‘अमृत’अंतर्गत भूमिगत गटार योजना टप्पा क्र.१- १०० कोटी, रस्ते विकास- २५ कोटी, हद्दवाढीसाठी विशेष निधी- १०० कोटी अशा एकूण ४७५ कोटींची कामे प्रस्तावित असल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी सांगितले.