‘अल्पसंख्याकांच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध’
By Admin | Published: July 15, 2017 01:25 AM2017-07-15T01:25:36+5:302017-07-15T01:25:36+5:30
अकोला : मध्य प्रदेश शासनाने राज्यातील मागासवर्गीय व अल्पसंख्याक वर्गासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या असून, त्याचाच परिपाक म्हणून या वर्गाचा दर्जा प्रगत होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मध्य प्रदेश शासनाने राज्यातील मागासवर्गीय व अल्पसंख्याक वर्गासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या असून, त्याचाच परिपाक म्हणून या वर्गाचा दर्जा प्रगत होत आहे. अन्य राज्यानेही मध्य प्रदेश शासनाच्या अशा विकासकारी योजनांचा कित्ता गिरवून या समाजाचा दर्जा सुधारावा, अशी अपेक्षा मध्य प्रदेश शासनाच्या मागास व अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष एस. के. मुद्दीन यांनी केली.
स्थानीय शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एमपी शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, राज्य शासनाने अल्पसंख्याक वर्गासाठी अनेक विकासात्मक योजना अमलात आणून त्यांचा लाखो अल्पसंख्याक युवक वा नागरिक लाभ घेत आहेत. या विभागाचा बजेट हा राज्यातील अन्य खात्याच्या बजेटपेक्षा जास्त ठेवण्यात आला असल्याची माहिती मुद्दीन यांनी यावेळी दिली.
भाजप शासनात अल्पसंख्याक वर्गाचा विकास जास्त प्रमाणात केल्या जात असल्याचे त्यांनी सांगून मुस्लिमांची राष्ट्रीय विकासात भागीदारी वाढली आहे. गोरक्षणाच्या नावावर अल्पसंख्याक वर्गावर अन्याय होत असल्याची ओरड खोटी असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. हिंदू, मुस्लिम समाजात स्नेह व आपसी सद्भाव वाढला पाहिजे, यासाठी आपला खटाटोप असल्याचे त्यांनी सांगून पक्षात मुस्लिमांचा टक्का वाढला असून, हे पक्षाच्या राष्ट्रीय सहिष्णुतेची निशाणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेत यावेळी भाजप महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, विनोद बोर्डे, धनंजय गिरधर, अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेरोद्दीन, महानगराध्यक्ष हाजी चांद खान, जाकीर पठाण, वकार अहमद, जमीर अहमद आदी उपस्थित होते.