भाजपाचे नगरसेवक अनिल गरड अपात्र
By admin | Published: June 7, 2017 01:31 AM2017-06-07T01:31:12+5:302017-06-07T01:31:12+5:30
अकोला: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपाचे नगरसेवक अनिल गरड यांच्यावर अवघ्या तीन महिन्यांतच अपात्र होण्याची वेळ आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपाचे नगरसेवक अनिल गरड यांच्यावर अवघ्या तीन महिन्यांतच अपात्र होण्याची वेळ आली. एसटी महामंडळात सेवारत असताना अनिल गरड यांनी स्वायत्त संस्थेची निवडणूक लढल्याप्रकरणी तक्रारकर्ते विजय मालोकार यांनी विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांच्याकडे याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सुनावणी पार पडल्यानंतर विभागीय आयुक्तांनी नगरसेवक गरड यांना अपात्र करण्याचे आदेश जारी केले.
फेब्रुवारी २०१७ मध्ये मनपाची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. एसटी महामंडळात सेवारत असलेल्या अनिल गरड यांनी भाजपाच्यावतीने प्रभाग क्रमांक १० मधून निवडणूक लढवली आणि निवडणुकीत विजयी झाले; परंतु महामंडळात सेवारत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक लढण्यापूर्वी पदाचा राजीनामा देणे बंधनकारक आहे.
राजीनामा दिल्यानंतर कर्मचारी निवडणूक लढण्यास पात्र ठरतो. अनिल गरड यांनी महामंडळात सेवारत पदाचा राजीनामा न देता निवडणूक लढवली.
याप्रकरणी शिवसेना नेते विजय मालोकार यांनी एसटी महामंडळासह विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे मार्च महिन्यात तक्रार दाखल केली. विभागीय आयुक्तांकडे तीन वेळा सुनावणी घेण्यात आली. सुनावणीअंती अनिल गरड यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी जारी केला आहे. यासंदर्भात नगरसेवक अनिल गरड यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.
हायकोर्टात कॅव्हेट दाखल!
विभागीय आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती मिळवण्यासाठी अनिल गरड यांच्याकडे हायकोर्टाचा पर्याय आहे. ही बाब लक्षात घेता तक्रारकर्ते विजय मालोकार यांनी नागपूर खंडपीठात कॅवेट दाखल केल्याची माहिती आहे.