भाजप नगरसेविका पतीची अकोट नगराध्यक्षांना मारहाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 11:04 AM2020-11-18T11:04:25+5:302020-11-18T11:04:36+5:30

रवींद्र केवटी यांनी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे यांच्या कानशिलात लगावल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी अग्रसेन भवनात घडली.

BJP corporator's husband beats Akot mayor! | भाजप नगरसेविका पतीची अकोट नगराध्यक्षांना मारहाण!

भाजप नगरसेविका पतीची अकोट नगराध्यक्षांना मारहाण!

Next

अकोटः प्रभागातील रस्ते प्रस्तावित करा तसेच मंजूर पाइपलाइन टाकण्यासाठी मागणी करणाऱ्या नगरसेविकेला दम दिल्यामुळे राग अनावर झाल्याने नगरसेविका पतीने अकोटचे नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे यांच्या कानशिलात लगावल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी अग्रसेन भवनात घडली. या घटनेमुळे नगर परिषदमधील भाजपा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

नंदीपेठ प्रभाग क्र. १६ च्या भाजपच्या दीपाली रवींद्र केवठी नगरसेविका आहेत. त्यांच्या प्रभागात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम मंजूर झाले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला काम सुरू करण्याबाबत विचारणा केली असता, कंत्राटदाराने नगराध्यक्षांनी सांगितले तर काम सुरू करतो, असे सांगितले. त्यामुळे नगरसेविका यांनी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे यांची भेट घेऊन रस्त्याचे काम सुरू करा, तसेच पिण्यासाठी पाइपलाइन टाकण्याकरिता कंत्राटदाराला सांगा, अशी विनंती केली; मात्र नगराध्यक्ष माकोडे यांनी जा, नाही करीत तुझे काम, काय होते ते करून घे...असा दम भरला. ही अपमानास्पद वागणूक नगरसेविका पती रवींद्र केवटी यांना कळताच त्यांनी, नगराध्यक्षांना पत्नीला दिलेल्या वागणुकीबाबत विचारणा केली असता, त्यांच्यात बाचाबाची झाली. संतप्त रवींद्र केवटी यांनी नगराध्यक्ष माकोडे यांच्या कानशिलात लगावली. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. भाजप पदाधिकाऱ्यांनी सावरासारव केली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संपर्क दौरानिमित्ताने स्थानिक अग्रसेन भवनमध्ये भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक मतदारांची बैठक पार पडली. बैठक संपताच भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर निवेदन स्वीकारत होते तर माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात व उमेदवार डॉ. प्रा. नितीन धांडे हे कार्यकर्ते, मतदारांसोबत चर्चा करीत होते. याप्रसंगी अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे उपस्थिती नव्हते. अचानक कानशिलात लगावल्याचे पाहून कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी नगरसेविका पती व नगराध्यक्ष यांच्याकडे धाव घेतली. विशेष म्हणजे नगर परिषदमध्ये भाजपाची सत्ता आहे. विकास कामे रखडली असल्याने अनेकदा सत्ताधारी व नगरसेवकांमध्ये खटके उडत आहेत. यापूर्वी कमिशनवरून चांगलाच वाद पेटला असता, एका लोकप्रतिनिधीच्या मध्यस्थीने वाद मिटविण्यात आला होता. नगर परिषद निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपल्याने विकास कामांवरून ओढाताण सुरू आहे. या सर्व प्रकाराकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीरतेने लक्ष देणे आवश्यक झाले आहे.

 

शहरातील प्रभागात पाणी पुरवठा योजना मंजूर आहे. काम धिम्या गतीने सुरू आहे. नगरसेविका पती रवींद्र केवटी यांना सबुरी नाही. काम सुरू होणार की नाही असे विचारल्यावर आपण त्यांना नाही होत म्हटल्यावर त्यांनी हात उगारला. याबाबत आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार आहे.

- हरिनारायण माकोडे, नगराध्यक्ष नगर परिषद, अकोट

Web Title: BJP corporator's husband beats Akot mayor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.