सेनेला शह देण्यासाठी भाजपची आक्रमक नेत्यांना पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:30 PM2020-02-12T23:30:33+5:302020-02-12T23:35:01+5:30

भाजपच्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदी अभ्यासू आमदार रणधीर सावरकर व महानगराध्यक्षपदी माजी महापौर विजय अग्रवाल यांची निवड केली असल्याचे संकेत आहेत.

BJP favors aggressive leaders in fighting for Sena | सेनेला शह देण्यासाठी भाजपची आक्रमक नेत्यांना पसंती

सेनेला शह देण्यासाठी भाजपची आक्रमक नेत्यांना पसंती

Next

- राजेश शेगोकार 
अकोला: भविष्याच्या राजकारणाची पेरणी ही वर्तमानातील निर्णयांवर अवलंबून असते, असे म्हणतात. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही अकोल्याच्या भविष्यातील राजकारणाची पेरणी सुरू केली आहे. एकेकाळचा मित्र असलेला शिवसेना या पक्षाने भाजपाच्या विरोधात उघडलेली आघाडी, आक्रमक असे पालकमंत्री अन् एकहाती सत्ता असलेल्या महापालिकेच्या कारभाराच्या चौकशीसाठी गठित समिती अशा घटनांच्या पृष्ठभूमीवर जिल्हा व शहर अशा दोन्ही आघाडीवर आक्रमक चेहरा देण्याच्या प्रयत्नातूनच भाजपच्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदी अभ्यासू आमदार रणधीर सावरकर व महानगराध्यक्षपदी माजी महापौर विजय अग्रवाल यांची निवड केली असल्याचे संकेत आहेत.
अकोल्याच्या राजकारणात खा. धोत्रे यांचा प्रभाव सर्वश्रुत आहे. अकोला महापालिकेत एकहाती सत्ता मिळवून त्यांनी आपली पकड दाखवून दिली. स्वत: चौथ्यांदा खासदार अन् केंद्रीय राज्यमंत्री पद ही सारी ताकद विधानसभेत लावून युतीला शत-प्रतिशत यश मिळवून दिले. दरम्यानच्या काळात राज्यात युतीचे फाटले अन् आतापर्यंत मित्र असलेला शिवसेना पक्ष सत्तेत आल्यानंतर आक्रमकपणे विरोधात उभा ठाकला. खा. धोत्रे यांच्या नेतृत्वात यश मिळविलेली महापालिका असेल किंवा शहरातील विकास कामे असतील, यांच्याविरोधात आक्रमकपणे आवाज उठविला गेला नव्हता. महापालिकेच्या सभेत राडा झाला की नंतर पुढच्या सभेपर्यंत शांतता असाच आतापर्यंतच्या आंदोलनाचा इतिहास आहे. याला काही अपवादही असले तरी ते बोटावर मोजता येतील असे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी महापालिकेतील अनागोंदी कारभाराचा लेखाजोखा थेट विधिमंडळापर्यंत नेला आहे. शौचालयांचा घोळ, फोर-जी प्रकरणात चव्हाट्यावर आलेली महापालिकेची इज्जत, करवाढीच्या प्रकरणात न्यायालयात तोंडावर आपटलेले प्रशासन, अमृत योजनेतील अनियमितता अशा एक ना अनेक प्रकरणांची पोलखोल विरोधकांनी सुरू केली आहे. आता विधिमंडळाची उपसमितीही नेमल्या गेली आहे. त्यामुळे भाजपाची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी आक्रमक व अभ्यासू अशा आ. रणधीर सावरकर यांची तसेच हा सारा कथित घोळ ज्यांच्या काळात झाल्याचा आरोप आहे, ते माजी महापौर यांच्या हाती जिल्हा व महानगराची सूत्रे देऊन जशास तसे उत्तर दिले जाईल, हे संकेतच भाजपाने दिले आहेत.
आ. सावरकर यांनी पहिल्याच टर्ममध्ये आक्रमक व अभ्यासू आमदार अशी ओळख निर्माण केली आहे. अकोला पूर्व हा त्यांचा मतदारसंघ असला तरी जिल्ह्याच्या कोणत्याही प्रश्नावर धावून जाताना त्यांना मतदारसंघाची कधीही आडकाठी आली नाही. खा. धोत्रे हे दिल्लीत व्यस्त असल्याने येथील पक्षसंघटनेवरची पकड सैल होणार नाही, तर अधिक प्रभावी होईल, हाही प्रयत्न आ. सावरकर यांच्या निवडीमागे आहे. दुसरीकडे विजय अग्रवाल यांनी महापालिका त्यांच्या शैलीने चालविली. पक्षाकडून एखादा निर्णय घेतला तर त्याची अंमलबजावणी करताना ते कोणाचीही भीडभाड ठेवत नव्हते. त्यामुळेच फाइल गहाळ प्रकरण असो की गुंठेवारीच्या प्रकरणात त्यांनी तातडीने पुढाकार घेत महापालिकेची भूमिका मांडली. आगामी काळात सेना व भाजपा हा संघर्ष चांगलाच पेटणार असल्याने पक्षाला आक्रमक नेतृत्वाची गरज होती, ती या दोघांच्या निवडीमुळे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

 

Web Title: BJP favors aggressive leaders in fighting for Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.