बाळापूरात भाजपला मतविभाजनाचा फायदा

By admin | Published: May 17, 2014 06:35 PM2014-05-17T18:35:56+5:302014-05-17T18:56:28+5:30

बाळापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाला मतविभाजनाचा सरळ लाभ झाल्याचे दिसत आहे.

BJP has the advantage of divisive politics in the child | बाळापूरात भाजपला मतविभाजनाचा फायदा

बाळापूरात भाजपला मतविभाजनाचा फायदा

Next

बाळापूर : अकोला लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे संजय धोत्रे यांनी सलग तिसर्‍यांदा विजयश्री खेचून आणल्यानंतर त्यांना बाळापूर विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या मतांची टक्केवारी पाहता त्यांना मतविभाजनाचा सरळ लाभ झाल्याचे दिसत आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारिप-बहुजन महासंघाचे असल्यामुळे या मतदारसंघातून मुसंडी मारण्याचे मनसुबे प्रकाश आंबेडकर यांनी रचले होते; परंतु हाती आलेल्या निकालातून त्यांची पार निराशा झाली असून, संजय धोत्रे यांना सर्वाधिक मते घेण्यापासून ते रोखू शकले नाहीत. बाळापूर विधानसभा मतदारसंघात बाळापूर व पातूर तालुक्यासह अकोला तालुक्यातील उगवा सर्कलचा समावेश होतो. हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच धर्मनिरपेक्ष पक्षासोबत राहिलेला आहे. १९६२ पासूनच्या १२ विधानसभा निवडणुकांमध्ये ८ वेळा काँग्रेस तर ३ वेळा भाजप-शिवसेना व एक वेळा भारिप-बमसं पुरस्कृत उमेदवार विजयी झाला आहे. वर्ष २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे यांना ४२०७२, काँग्रेसचे लक्ष्मणराव तायडे ३२९०५ तर प्रकाश आंबेडकर यांना ३७१०४ मते मिळाली होती. यावेळीही धर्मनिरपेक्ष मतविभाजनामुळे या मतदारसंघात भाजप पहिल्या क्रमांकावर तर काँग्रेस तिसर्‍या क्रमांकावर फेकल्या गेली. वर्ष २००९ मध्ये मात्र प्रकाश आंबेडकर यांनी ५४०९४ मते घेऊन प्रथम स्थान मिळविले, संजय धोत्रे ४०३२३, बाबासाहेब धाबेकर यांना २६६८२ मते मिळाली होती. वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांना बाळापूर विधानसभा मतदारसंघात ६३५८७ (३८.२५टक्के) , प्रकाश आंबेडकर यांना ५४४९७ (३२.७८ टक्के) व हिदायत पटेल यांना ४३२१४ (२५.९९ टक्के) मते मिळाली. या मतदार संघात पक्षाचा आमदार नसल्याने आणि पक्षातील गटातटाच्या राजकारणामुळे काँग्रेसच्या लोकसभा उमेदवाराला त्याचा फटका बसला आणि मोदी लाटेवर स्वार होऊन संजय धोत्रे विजयी झाले. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन रोखण्यात काँग्रेस-राकाँ आघाडी व भारिप-बमसंला सपशेल अपयश आल्यामुळेच त्याचा फायदा भाजपला झाला. भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार, काँग्रेसचे माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, ॲड. नतिकोद्दीन खतीब, नारायण गव्हाणकर यांनी पक्षासाठी पूर्ण ताकद पणाला लावली; परंतु मतदारांनी त्यांना नाकारले. या मतदारसंघात मराठा, बौद्ध, माळी, मुस्लीम, कुणबी या समाजाचे प्राबल्य आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी या समाजाची मोट बांधून स्वत:ची नौका पार करून घेतली.

Web Title: BJP has the advantage of divisive politics in the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.