ठेक्याने दिलाय महाराष्ट्र माझा, अशी म्हणण्याची वेळ भाजपाने आणलीय - सुजात आंबेडकर
By Atul.jaiswal | Published: October 25, 2023 08:33 PM2023-10-25T20:33:33+5:302023-10-25T21:17:15+5:30
अकोला : २०१४ च्या च्या निवडणुकीत 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी विचारणा भाजपाने केली होती. आज याच भाजपाने ...
अकोला : २०१४ च्या च्या निवडणुकीत 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी विचारणा भाजपाने केली होती. आज याच भाजपाने व राज्यातील मनुवाद्यांनी ठेक्याने दिलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बुधवारी येथे बोलताना केला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवार, २५ ऑक्टोबर रोजी भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित करण्यात आलेला धम्म मेळाव्यात सुजात आंबेडकर बोलत होते.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड प्रकाश आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर यांच्यासह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. दुपारी आंबेडकर यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील विविध मार्गाने निघालेली ही यात्रा अकोला क्रिकेट स्टेडियमवर येऊन तिचे जाहीर मेळाव्यात रूपांतर झाले, तेथे आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. सुजात आंबेडकर यांनी यावेळी बोलताना राज्यातील भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) सरकारवर टीकेची झोड उठवली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपाने नकली आंबेडकरवादी पुढे केल्याचे सांगून, त्यांच्यावर विश्वास न ठेवता निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तनासाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले.
राहुल गांधी यांचे नाव न घेता ते म्हणाले की, दिल्लीतल्या नेत्याने नफरत की दुकान बंद करण्यासाठी प्रेमाची दुकान उघडली आहे, परंतु त्यांनी एकदा बाळासाहेब आंबेडकर यांना आजमावून बघावे; भाजपाचा नफर चा बाजार उठवून दाखवू, असे सुजात आंबेडकर म्हणाले. देशातील संघ, भाजपच्या विचारधारेचा पराभव केवळ आंबेडकरवादी विचारधारच करू शकते. या विचारधारेला घाबरलेल्या सत्ताधाऱ्यांनी आता नकली आंबेडकरवाद्यांना पे रोलवर ठेवले आहे. आपण सतर्क राहिलो नाही तर हे नकली आंबेडकरवादी आपल्या वस्त्यांमध्ये शिरून अपप्रचार करतील. असेच नकली आंबेडकरवादी आपल्या चळवळीत संभ्रम निर्माण करत असल्याचेही यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले.