भाजपने विदर्भातील जनतेचा अपमान केला - वामनराव चटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 03:43 PM2018-12-19T15:43:48+5:302018-12-19T15:44:58+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समिती चार संघटना, पाच राजकीय पक्षांच्या सोबतीने लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी विदर्भात २ ते १२ जानेवारीदरम्यान जनजागृती यात्रा काढली जात आहे, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी येथे सांगितले.
अकोला: गेल्या निवडणुकीत स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्वासन देत विदर्भाच्याच नावाने भाजपने निवडणूक लढवली. मतदारांनी प्रामाणिकपणे साथही दिली. त्यानंतर आता भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी वेगळा विदर्भ अजेंड्यावर नाही, असे सांगत विदर्भातील जनतेचा अपमान केला आहे. जनतेच्या फसवणुकीविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समिती चार संघटना, पाच राजकीय पक्षांच्या सोबतीने लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी विदर्भात २ ते १२ जानेवारीदरम्यान जनजागृती यात्रा काढली जात आहे, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी येथे सांगितले.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वेगळ््या विदर्भाच्या मागणीसाठी येत्या काळात केल्या जाणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली.
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्येही ते होणार आहे. भाजपाने वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्याची घोषणा करून लोकसभेत ठराव घ्यावा, त्यातून विदर्भातील जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करावे, असे आवाहनही अॅड. चटप यांनी केले. केंद्र शासनाने वेगळ््या विदर्भाची मागणी पूर्ण न केल्यास २०१९ मध्ये होणाºया लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका विदर्भ राज्य आंदोलन समिती लढवणार आहे. त्यामध्ये विदर्भवादी असलेले पाच पक्ष, चार संघटना सहभागी आहेत. तसेच विदर्भवादी नेते, कार्यकर्ते, विदर्भातील शेतकरी संघटनाही सहभागी आहेत, असेही अॅड. चटप यांनी सांगितले. यावेळी रंजना मामर्डे, सुरेश जोगडे, संतोष देशमुख, मनोज तायडे, शंकर कवर, डॉ. नीलेश पाटील उपस्थित होते.
- पश्चिम, पूर्व विदर्भात यात्रा
वेगळ््या विदर्भाच्या मुद्द्यावर जनजागृतीसाठी नागपूर येथून २ जानेवारी रोजी पश्चिम आणि पूर्व विदर्भात एकाच वेळी यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये ३ जानेवारी रोजी यात्रा अमरावती येथे येणार आहे. ४ जानेवारी-अकोला, बाळापूर, खामगाव, नांदुरा, मलकापूर. ५ जानेवारी- मोताळा, बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा. ६ जानेवारी-लोणार, मेहकर, रिसोड, मालेगाव, वाशिम. ७ जानेवारी- मंगरुळपीर, कारंजा लाड, बार्शीटाकळी, अकोट. ८ जानेवारी-अंजनगाव, अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड. ९ ते १२ जानेवारीदरम्यान यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात जाऊन नागपूर येथे यात्रेचा समारोप होणार आहे.
- समितीमध्ये सहभागी संघटना, पक्ष
विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझा, नागविदर्भ आंदोलन समिती, जांबुवंतराव धोटे विचार मंच, आम आदमी पार्टी, बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी, राष्ट्रीय जनसुराज्य पक्ष, प्रहार जनशक्ती, खोरिप आंदोलनात सहभागी आहे.