भाजपची बैठक; शिवसेनेची फरपट
By admin | Published: August 26, 2015 01:40 AM2015-08-26T01:40:39+5:302015-08-26T01:40:39+5:30
सत्ताधारी संभ्रमात; सभेचे आयोजन कधी?
अकोला: महापालिकेच्या स्थगित सर्वसाधारण सभेचे आयोजन नेमके कधी करायचे, यावरून खुद्द सत्ताधारी भाजपमध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे. सोमवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत संभाव्य विषयांवर केवळ चर्चा करण्यात आली असली तरी सभा नेमकी कधी बोलवायची, यावर निर्णय होऊ शकला नाही. यामागे भाजपमधील अंतर्गत राजकारण कारणीभूत मानल्या जात असून, मित्र पक्ष शिवसेनेची नाहक फरपट होत असल्याचे दिसत आहे. शहर विकासाच्या मुद्यावर १४ ऑगस्ट रोजी आयोजित सर्वसाधारण सभा महापौर उज्ज्वला देशमुख यांनी स्थगित केली. तत्पूर्वी, प्रशासनाने जमीनदोस्त केलेल्या खुले नाट्यगृहालगतच्या १२ दुकानांचा ठराव मांडण्याच्या मुद्यावर १३ ऑगस्ट रोजी भाजपमध्ये चांगलीच माथापच्ची करण्यात आली. भाजपमधील एक गट १२ दुकानांचा ठराव घेण्यास हरकत नसल्याच्या बाजूवर ठाम होता, तर ही बाब कायदेशीर पेचात अडकल्यामुळे असा ठराव मंजूर न करण्याचे मत दुसर्या गटाने मांडले होते. भाजपमधील अंतर्गत राजकारणामुळे १४ ऑगस्टची सभा स्थगित होणार असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने प्रकाशित केले होते, हे विशेष. सभेच्या दिवशी खिचडी व अतिक्रमणाच्या मुद्यावर घडलेल्या वादंगाचे सर्मथन होऊच शकत नाही. त्यामुळे ही सभा लांबणीवर जाईल, असे चित्र होते. परंतु या सभेतील विषय सूचीवर महत्त्वाचे विषय असल्याने ते मंजूर होण्यासाठी सत्ताधार्यांनी कार्योत्तर मंजुरीचे पाऊल उचलले. एकीकडे कार्योत्तर मंजुरीचा निर्णय घ्यायचा अन् दुसरीकडे सभेच्या आयोजनावर माथापच्ची करायची, असे विसंगत धोरण भाजपने अंगिकारल्याचे दिसून येते.