भाजप आमदारांना स्वपक्षातच स्पर्धा : उमेदवारीसाठी इच्छुकांच्या महात्त्वाकांक्षेला ‘भरती’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:10 PM2019-09-04T12:10:17+5:302019-09-04T12:10:48+5:30
विद्यमान आमदारांच्या विरोधात स्वपक्षातूनच आव्हान उभे ठाकल्याचे सोमवारी झालेल्या मुलाखतींमधून समोर आले आहे.
- राजेश शेगोकार
लोकमत न्यूज नेटवर्क
राजकारण प्रवाही असते असे म्हटले जाते; मात्र सत्ता केंद्र्र एकाच नेत्यापाशी थांबले की हळूहळू ‘बदल हवा’ अशी मानसिकता जोर धरू लागते. अकोल्यातील अकोला पश्चिम, मूर्तिजापूर व अकोट या तीन विधानसभा मतदारसंघात अशीच स्थिती आली असल्याचे स्पष्ट होत आहे. येथील विद्यमान आमदारांच्या विरोधात स्वपक्षातूनच आव्हान उभे ठाकल्याचे सोमवारी झालेल्या मुलाखतींमधून समोर आले आहे. कधी काळी काँग्रेसने मतदारसंघा बाहेरील उमेदवार दिला तर तो विजयी होत असे हे चित्र देशभर होते. अकोल्यातही वसंतराव साठेच्या रूपाने हा अनुभव अकोलेकरांनी घेतला आहे. काँग्रेसची त्यावेळी जी शक्ती होती तीच शक्ती आता भाजपाकडे एकवटली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पक्षात काम करणाºया नेते व पदाधिकाऱ्यांनाही महत्त्वाकांक्षेचे घुमारे फुटले आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने तब्बल चार खासदारांचे तिकीट कापून धक्कातंत्राचे राजकारण यशस्वी करून दाखविले. त्यामुळे कुणाचेही ‘तिकीट’ कापले जाऊ शकते हा विश्वास पदाधिकाºयांमध्ये आल्यामुळेच विद्यमान हेवीवेट आमदारांच्या विरोधात उमेदवारी मागण्याची स्पर्धा रंगली आहे. या स्पर्धेत कोण बाजी मारेल, हे काळच ठरविणार असला तरी या तीनही मतदारसंघात अस्वस्थता आहे हे या मुलाखतींच्या निमित्ताने अधोरेखित झाल्याचे मान्यच करावे लागेल.
अकोला पश्चिम
हा मुस्लीमबहुल मतदारसंघ मानला जातो; मात्र या मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून आमदार गोवर्धन शर्मा हे विजयी होत आले आहे. महापालिकेच्या क्षेत्रात संपूर्ण मतदारसंघ येत असल्याने येथील समस्यांचे स्वरूप साहजिकच नागरी आहे. या नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी मुख्यत: महापालिकेची असल्याने सांडपाण्याचा निचरा, झोपडपट्टी विकास, रस्ते, पथदिवे आदीबाबतचा रोष हा आमदारांवर येण्यापेक्षा महापालिकेवरच येतो. त्यामुळे आ. शर्मा यांच्या विरोधात जनमत नसल्याचे चित्र रंगविले जाते. यावेळी मात्र या मतदारसंघातून आ. शर्मा यांना चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे. महापौर विजय अग्रवाल, हरीश आलिमचंदानी, डॉ. योगेश शाहू, दिनेश श्रीवास, चांद खा काले खा., माजी महापौर उज्ज्वला देशमुख, गोपी ठाकरे, अॅड. मोतीसिंह मोहता व डॉ. अशोक ओळंबे अशा अनेक नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागून आ. शर्मा यांना आव्हान दिले आहे. या मतदारसंघात ११ पूर्ण व एक अर्धा प्रभाग येतो. त्यामधील नगरसेवकांची स्थिती पाहिली तर ४६ पैकी १८ जागा भाजपाने जिंकलेल्या आहेत; काँग्रेस १३ व राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक विजयी झाले आहेत. ही स्थिती पाहता येथे भाजपाला काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने बरोबरीत रोखले असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे सेनेचे ७ व तीन अपक्षांनीही स्थान मिळवून आपली व्होट बँक सिद्ध केली आहे. या पृष्ठभूमीवर भाजपाला आलेल्या ‘अच्छे दिन’ मध्ये सत्तेचे आम्हालाही वाटेकरी होऊ द्या, अशा भूमिकेतूनच इच्छुकांना उमेदवारीची ‘भरती’ आली आहे.
मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ
हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून लागोपाठ दुसºयांदा विजयी होत आमदार हरीश पिंपळे यांनी भाजपाच्या विजयाचा झेंडा कायम ठेवला. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर कोणालाही आमदारकीची हॅट्ट्रिक साधता आलेली नाही. त्यामुळे आता येथे उमेदवारीमध्ये बदल करावा, अशी मागणी भाजपामधूनच लावून धरल्या जात आहे. परिणामी सोमवारी झालेल्या मुलाखतीमध्ये तब्बल १४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या असून, त्यामध्ये माजी जि. प. अध्यक्ष श्रावण इंगळे, राजकुमार नाचणे, त्रिरत्न इंगळे, परिमल कांबळे आदींचा समावेश आहे. पिंपळे यांची गेल्या पाच वर्षांची कारकीर्द ही पालकमंत्री व खासदार अशा दोन गटात विभागल्या गेली आहे. काही काळ ते पालकमंत्र्यांच्या गटात होते त्यामुळेच माजी जि.प.अध्यक्ष श्रावण इंगळे यांना पक्षात प्रवेश देत त्यांना आव्हान उभे केल्याचीच चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत इंगळे यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पिंपळे यांना चांगली लढत दिली होती हे विशेष. येथे कार्यकर्त्यांचेही दोन गट पडले आहेत. विकास कामांचा मुद्दा, पक्षातील पदाधिकाºयांसोबतचे संबंध अशा अनेक कारणांनी येथे आ. पिंपळे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी भूमिका घेतल्यानेच उमेदवारीची स्पर्धा वाढली आहे. दुसरीकडे या मतदारसंघावर शिवसेनेनेही दावा प्रबळ ठेवला आहे. सेनेला किमान दोन मतदारसंघ हवे आहेत, त्यामुळे युती झालीच अन् युती धर्म पाळण्यासाठी भाजपाने एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतलाच तर मूर्तिजापूर हा मतदारसंघ दिला जाण्याची शक्यता कायमच आहे.
अकोट विधानसभा मतदारसंघ
एक अपवाद वगळता प्रत्येक वेळी नवा आमदार देणारा मतदारसंघ असा इतिहास आहे. राजकारणात गणिते मांडताना मागील लढतीचे सारे संबंध तपासले जातात. त्यामध्ये या इतिहासाचा संबंध हा सर्वात आधी चर्चेत येतो म्हणूनच या मतदारसंघात उमेदवारांना आपले नशीब अजमावण्याची संधी असते. आता तर बाहेरचा उमेदवार हे आणखी एक प्रभावी कारण भाजपाच्याच नेते व पदाधिकाºयांनी समोर केले असल्याने विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या विरोधात सध्या राजकारण तापले आहे. आ. भारसाकळे हे भाजपामधील ज्येष्ठ आमदार, आतापर्यंत सात निवडणुका ते लढले, पाच जिंकले. अमरावतीच्या दर्यापूर येथून अकोटात २००९ मध्ये अपक्ष व २०१४ ला भाजपाच्या तिकिटावर लढले त्यावेळी त्यांना ‘बाहेरचा’ उमेदवार अशी टीका सहन करावी लागली नव्हती. तीच टीका आता स्वपक्षीयांकडूनच केली जात आहे. या मतदारसंघातून तब्बल ३२ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. यामध्ये आजी-माजी नगराध्यक्ष, माजी आमदार व सक्रिय पदाधिकारीही आहेत. भारसाकळे यांना एवढा विरोध असण्यामागे त्यांच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीचा मुद्दा समोर केला जात आहे. ‘उमेदवार बदला’ अशी मागणी गेल्या महिनाभरापासून विविध पातळीवर होत आहे; मात्र या मागणीबाबत आ. भारसाकळे यांनी कुठेही अधिकृतरीत्या आपले मत जाहीर केले नाही. त्यांना उमेदवारीबाबत खात्री आहे, तर या इच्छुकांना ‘आमच्या भावनांचा’ आदर पक्षश्रेष्ठी करतील, अशी आशा आहे. त्यामुळे निर्णय होईल तेव्हा होईल, सध्या मात्र भाजपाच्या अंतर्गतच बंडाळीचे बीजारोपण झाले आहे हे निश्चितच!