तेल्हारा पालिकेत बांधकाम समितीवरून भाजप, राष्ट्रवादीत कलगीतुरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:12 AM2021-02-05T06:12:28+5:302021-02-05T06:12:28+5:30
नगर परिषदमध्ये भाजप शेतकरी पॅनल व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. गेल्या चार वर्षांपासून सत्ताधारी एकत्र आहेत. मात्र काही महिन्यानंतर ...
नगर परिषदमध्ये भाजप शेतकरी पॅनल व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. गेल्या चार वर्षांपासून सत्ताधारी एकत्र आहेत. मात्र काही महिन्यानंतर होऊ घातलेल्या न.प. च्या सार्वत्रिक निवडणुकीचे राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. विषय समितीचे वाटप सुद्धा यापूर्वीच करण्यात आले होते. मात्र बांधकाम समितीवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अडून बसले आहेत. काही दिवसांपूर्वी सुद्धा विषय समितीची निवडणूक झाली होती. मात्र त्यावेळी सुद्धा दोन्ही पक्षांनी हीच भूमिका घेतल्याने निवडणूक रद्द झाली होती. त्यावेळी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी वेगळेच कारण पुढे करून निवडणुकीला हजर झालो नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्यावेळी सुद्धा हेच खरे कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु पुन्हा २८ जानेवारी रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. मात्र उमेदवारी अर्जच आले नसल्याने पुन्हा निवडणूक रद्द करण्यात आली. बांधकाम समितीवरच भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस अडून बसल्यामुळे अखेर निवडणूक रद्द झाली.