उपोषण रद्द करण्यासाठी भाजपाची धावाधाव; प्रभाग क्र. आठमधील नागरिकांची मनधरणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 06:24 PM2018-09-16T18:24:47+5:302018-09-16T18:24:58+5:30
उपोषण रद्द करण्यासाठी संबंधित नागरिकांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न नगरसेवकांच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती आहे.
अकोला: जुने शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील समस्यांकडे भाजप नगरसेवकांनी पाठ फिरविल्याचा आरोप करीत गजानन नगर व परिसरातील नागरिकांनी १८ सप्टेंबरपासून मनपासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. नागरिकांच्या भूमिकेमुळे पक्षाची बदनामी होण्यासोबतच वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल, या विचारातून सदर उपोषण रद्द करण्यासाठी संबंधित नागरिकांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न नगरसेवकांच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती आहे.
महापालिका क्षेत्राची हद्दवाढ करताना अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या भौरद ग्रामपंचायतमधील गजानन नगर, लक्ष्मी नगर, आश्रय नगर, राव नगर, मेहरे नगर, अमरप्रीत कॉलनी, राम नगर, पोलीस वसाहत, लुंबिनी नगर आदी दाट लोकवस्तीच्या परिसराचा प्रभाग क्रमांक आठमध्ये समावेश झाला. या प्रभागात मनपाच्या निवडणुकीत चारही उमेदवार निवडून आले. त्यांच्या विजयासाठी या प्रभागात खुद्द भाजपाचे लोकप्रतिनिधी-पदाधिकारी ठाण मांडून होते. प्रभागातील मूलभूत समस्या निकाली काढण्याची जबाबदारी असणाºया भाजप नगरसेवकांनी मागील वर्षभरापासून गजानन नगरमधील गल्ली क्रमांक ३, ४, ५, ६, ७, ८ व ९ कडे ढुंकूनही पाहिले नसल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करीत आहेत. प्रभागात चालण्यासाठी धड रस्ते नाहीत. पथदिव्यांची समस्या कायम आहे. पाणी पुरवठा होत नाही. सर्वत्र अस्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, साफसफाईसाठी कर्मचारी फिरकत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. नागरिकांच्या समस्यांची कोणीही दखल घेत नसल्यामुळे या भागातील महिला, पुरुष व युवकांनी स्वयंस्फूर्तीने डाबकी रोडवर रास्ता रोको आंदोलन पुकारले होते. त्यावेळी महापौर विजय अग्रवाल यांनी प्रभागाची पाहणी करून रस्त्यासाठी मुरूम टाकण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानंतरही प्रभागात कोणत्याही सोयी-सुविधा दिल्या नसल्याचा आरोप करीत गजानन नगरवासीयांनी १८ सप्टेंबरपासून महापालिकेसमोर बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी मनपासमोर उपोषण छेडल्यास पक्षाची नाहक बदनामी होऊन नगरसेवकांना पक्षातील वरिष्ठांच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजपच्यावतीने उपोषण छेडणाºया नागरिकांच्या भेटी घेऊन उपोषण रद्द करण्यासाठी त्यांची मनधरणी केली जात असल्याची माहिती आहे.