भाजपकडे उमेदवारीसाठी गर्दी; ८८ इच्छुक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 01:45 PM2019-09-03T13:45:12+5:302019-09-03T13:45:22+5:30

ना. बावनकुळे यांनी सोमवारी सकाळी भाजप कार्यालयात एकूण ८८ जणांच्या मुलाखती घेत, त्यांचे म्हणणे जाणून घेतले.

BJP rush to get nomination; ८८ Interested! | भाजपकडे उमेदवारीसाठी गर्दी; ८८ इच्छुक!

भाजपकडे उमेदवारीसाठी गर्दी; ८८ इच्छुक!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोल्यातील पाच मतदारसंघांसाठी सोमवारी भारतीय जनता पार्टीतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इच्छुकांसोबत चर्चा केली. यावेळी अकोट मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याविरोधात स्थानिक भाजपा नेत्यांची एकजूट मुलाखती दरम्यानही कायमच दिसून आली. भारसाकळे हे अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे या मतदारसंघात स्थानिक उमेदवारच द्या, असे निवेदन सर्व इच्छुकांनी एकमताने दिले. दरम्यान, अकोट विधानसभा मतदारसंघातून एकूण ३२ जणांनी, बाळापूर येथील २९, मूर्तिजापूर १४, अकोला पश्चिममध्ये ८, तर अकोला पूर्वमध्ये ५ जणांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. यामध्ये भाजपच्या चार विद्यमान आमदारांचाही समावेश आहे.
ना. बावनकुळे यांनी सोमवारी सकाळी भाजप कार्यालयात एकूण ८८ जणांच्या मुलाखती घेत, त्यांचे म्हणणे जाणून घेतले. दरम्यान, बावनकुळे सोमवारी सकाळी अकोल्यात आले होते.
त्यांचे आळशी संकुलमधील भाजपच्या जिल्हा कार्यालयात आगमन झाल्यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शहराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी स्वागत केले. मुलाखतींना सुरुवात करण्यापूर्वी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कोअर कमिटीची बैठक घेऊन विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. त्यानंतर कार्यालयातील एका कक्षामध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. इच्छुक उमेदवार दिलेला अर्ज भरून मुलाखतीदरम्यान त्यांनी केलेले कार्य आणि आपण निवडणूक लढविण्यासाठी कसे सक्षम आहोत, याची माहिती ना. बावनकुळे यांना देत होता. प्रत्येकाची पाच मिनिटांमध्ये मुलाखत घेण्यात आली.

अकोट व तेल्हारा तालुक्यातील सर्वाधिक
अकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीकरिता अकोट व तेल्हारा तालुक्यातील सर्वाधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या. विशेष म्हणजे, सर्व इच्छुक उमेदवारांनी सामूहिक निवेदन देत जन्माने व कर्माने स्थानिक असलेल्या आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, अशा एकमुखी मागणीचे निवेदन दिले. अकोटचे नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, माजी आमदार वसंतराव खोटरे, माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, भाजप जिल्हा बुथ प्रमुख राजेश नागमते, तेल्हारा नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, विशाल प्रभाकरराव गणगणे, नयना मनतकार, स्मिता राजनकर, अनुप मार्के, किशोर भागवत, गजानन उंबरकार, माया घुले, डॉ. कृष्णराव तिडके, बाळकृष्ण नेरकर, अ‍ॅड. अतुल सोनखासकर व राजेंद्र पुंडकर यांनी मुलाखत दिली.


अकोला पश्चिममध्ये बदलाची आशा!
अकोला पश्चिममध्ये आमदार गोवर्धन शर्मा हे सातत्याने पाच वेळा विजयी झाले आहेत. या मतदारसंघात नव्या चेहऱ्याला संधी मिळेल, या अपेक्षेत तब्बल आठ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामध्ये आ. शर्मा यांच्यासह महापौर विजय अग्रवाल, हरीश आलिमचंदानी, डॉ. योगेश शाहू, दिनेश श्रीवास, चांदखा कालेखा., उज्ज्वला देशमुख, गोपी ठाकरे, अ‍ॅड. मोतीसिंह मोहता व डॉ. अशोक ओळंबे यांचा समावेश आहे.


अकोला पूर्वमध्ये सर्वात कमी उमेदवार
अकोला पूर्वमध्ये आ. रणधीर सावरकर यांनाही स्पर्धक निर्माण झाले आहेत; मात्र इतर मतदारसंघाच्या तुलनेत येथे स्पर्धा कमी आहे. सोमवारी आ. सावरकर यांच्यासह संजय तिकांडे, आशिष पवित्रकार, डॉ. अशोक ओळंबे व गोपी ठाकरे यांनी मुलाखती दिल्या.


बाळापुरातही भाजपची तयारी
बाळापूर या मतदारसंघावर मित्रपक्ष शिवसेना व शिवसंग्रामचा दावा कायम असतानाच भाजपानेही आपली तयारी सिद्ध केली आहे. येथे खुद्द भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, रामदास लांडे व मनोहर राहणे यांनी मुलाखत देऊन उमेदवारी मागितली आहे.


मूर्तिजापुरात स्वपक्षातूनच आव्हान!
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्याविरोधात स्वपक्षातच मोठी नाराजी असल्याने येथेही इच्छुकांची मोठी गर्दी आहे. तब्बल १४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या असून, त्यामध्ये माजी जि. प. अध्यक्ष श्रावण इंगळे, राजकुमार नाचणे व त्रिरत्न इंगळे यांचा समावेश आहे.

Web Title: BJP rush to get nomination; ८८ Interested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.