भाजप-शिवसेनेतील शीतयुद्ध शिगेला!
By admin | Published: October 15, 2015 02:39 AM2015-10-15T02:39:21+5:302015-10-15T02:39:21+5:30
जिल्हाध्यक्ष, महापौरांसह स्थानिक पदाधिकार्यांना मुंबईत बोलाविले.
अकोला- राज्यात सत्तेत असलेल्या भाजप व शिवसेनेतील शीतयुद्ध शिगेला पोहोचले आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास निर्माण होणार्या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह महापौर आणि स्थानिक पदाधिकार्यांना बुधवारी तातडीने मुंबईला बोलाविण्यात आले. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तारूढ झाल्यापासूनच कोणत्या ना कोणत्या कारणावरून मतभेद झाले आहेत. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभावरून सत्तापक्षांतील मतभेद विकोपाला गेले आहेत. वेळप्रसंगी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा शिवसेनेने दिला असून, त्यापृष्ठभूमिवर मुंबईत बैठकाही सुरू झाल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता राज्यात भाजपला काही धोका आहे का, हे जाणून घेण्यासोबतच संभाव्य परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या प्रमुख पदाधिकार्यांना बुधवारी तातडीने मुंबईला बोलविण्यात आले. गुरुवारी मुंबईत या सर्व पदाधिकार्यांची बैठक होत आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, महापौर उज्ज्वला देशमुख, विजय अग्रवाल आणि काही प्रमुख पदाधिकारी रात्री ९ वाजता विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला रवाना झालेत.
आमदार मुंबईत
जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार दोन दिवसांपासून मुंबईत आहेत. वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आमदारांना मुंबईत बोलाविण्यात आले होते. शिवसेनेच्या भूमिकेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांना मुंबईतच थांबवून घेण्यात आले. शिवसेनेचे पदाधिकारीही मुंबईला रवाना सत्तेत निर्माण झालेल्या पेचप्रसंगामुळे शिवसेनेतसुद्धा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकार्यांना तातडीने मुंबईत बोलाविण्यात आले आहे. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी बुधवारी मुंबईला रवाना झालेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही बोलाविले!
शिवसेना आणि भाजपमधील मतभेद विकोपाला गेल्यामुळे राज्यात उद्भवणार्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही मुंबईला बोलाविण्यात आले असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील काही नेते बुधवारी मुंबईला रवाना झालेत. यात माजी आमदारांचाही समावेश आहे.