भाजप श्रेष्ठींकडून राडा प्रकरणाचा निपटाराः दोन्ही नगरसेवकांना दिली समज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:59+5:302021-06-20T04:14:59+5:30
अकोट नगर परिषदेला १५ व्या वित्त आयोगातून कामाचे प्रस्ताव टाकण्यावरून शुक्रवार, दि. १८ जून रोजी नगराध्यक्ष हरिनारायण ...
अकोट नगर परिषदेला १५ व्या वित्त आयोगातून कामाचे प्रस्ताव टाकण्यावरून शुक्रवार, दि. १८ जून रोजी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे यांच्या कक्षात भाजपचे नगरसेवक मंगेश लोणकर व मंगेश चिखले यांच्यात वादावादी झाली. यावेळी दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. नगराध्यक्ष कक्षात तिखट मिरची पूड पसरली होती. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातून लोखंडी पाइप व चाकू जप्त केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, माजी महापौर विजय अग्रवाल यांनी १९ जून रोजी अकोट गाठले. आमदार भारसाकळे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत मंगेश लोणकर, मंगेश चिखले तसेच नगराध्यक्ष यांच्याकडून नगर परिषद कारभाराची माहिती घेत घटनेमागील कारणमीमांसा जाणून घेतली. यावेळी जिल्हा पक्षश्रेष्ठींनी चांगल्या कानपिचक्या देत समज दिली. त्यानंतर या प्रकरणाचा निपटारा करण्यात यश आले. विकासकामाच्या निधीच्या वाटाघाटी कशा करायच्या, भविष्यात निवडणूक लक्षात घेता जनतेत पक्षाची प्रतिमा जपण्याबद्दल चर्चा झाली. दरम्यान, नगर परिषदेतील घटनेसंदर्भात पोलिसांनी दोन्ही नगरसेवकांना समजपत्र दिल्याचे समजते, तर परिसरात शस्त्र आढळल्याने अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे कळते.
------------------
एकहाती सत्ता, तरीही विकास ठप्पच!
अकोट पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. नगराध्यक्षापासून आमदार, केंद्रीय मंत्री अशी सत्ता आहे. गत तीन वर्षांत केंद्रात, राज्यात मतदार संघात व नगर परिषदेत सत्ता होती. परंतु, अकोट शहरात विकास ठप्प आहे. एकहाती सत्ता दिल्यानंतरही शहरात विकासाची मोठी कामे होऊ शकली नाहीत. येणाऱ्या सहा, आठ महिन्यांत तरी विकासाची पूर्तता करण्याची अपेक्षा नागरिकांना आहे.