भाजपचा जिल्हाभरात घंटानाद; धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 05:02 PM2020-08-29T17:02:47+5:302020-08-29T17:03:06+5:30
शनिवारी जिल्हाभरात भाजपसह विविध हिदुत्ववादी संघटनांच्यावतीने घंटानाद आंदोलन छेडण्यात आले.
अकोला: संसर्गजन्य कोरोनाच्या पृष्ठभूमिवर राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवली असून, पुजेसाठी केवळ पुजाऱ्यांना परवानगी आहे. याउलट इतर बहुतांश व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून, त्यामध्ये दारूच्या दुकानांचाही समावेश आहे. धार्मिक स्थळांच्या बाबतीत राज्य सरकारचा दुजाभाव लक्षात घेता धार्मिक स्थळे तातडीने खुली करण्याची मागणी लावून धरत शनिवारी जिल्हाभरात भाजपसह विविध हिदुत्ववादी संघटनांच्यावतीने घंटानाद आंदोलन छेडण्यात आले.
संसर्गजन्य कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्याच्या उद्देशातून केंद्र व राज्य सरकारने २३ मार्चपासून टाळेबंदी लागू केली. या दरम्यान सर्व उद्योग, व्यवसाय, दळणवळण संपूर्णत: ठप्प होते. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर १ जुलैपासून ‘अनलॉक’च्या पहिल्या टप्प्यात काही महत्त्वाचे उद्योग-व्यवसाय निर्धारित वेळेसाठी सुरूकरण्याची परवानगी देण्यात आली. यानंतर काही निर्बंध शिथिल करण्यात येऊन पुन्हा काही व्यवसायांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. यामध्ये चक्क दारू विक्रेत्यांनाही परवानगी दिल्याचे समोर आले. अर्थात, कोरोना विषाणूच्या प्रसाराला एकमेकांचा संपर्क कारणीभूत असताना दारू विके्रत्यांना व्यवसाय करण्याची मुभा दिली असली तरी राज्यभरातील धार्मिक स्थळे नागरिकांसाठी खुली करण्यावर निर्बंध कायम आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या धार्मिक भावना लक्षात घेता राज्य सरकारने नागरिकांसाठी धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी लावून धरत शनिवारी जिल्हा भाजपच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यातील धार्मिक स्थळांसमोर घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. यावेळी भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह विविध हिंदुत्ववादी संघटना आंदोलनात सामील झाल्या होत्या.
शहरात विविध ठिकाणी घंटानाद
शहरात भाजपचे लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष तसेच महापौर यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मोठे राम मंदिर, जैन मंदिर, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, राणी सती धाम, विठ्ठल मंदिर, संतोषी माता मंदिर, गुरूद्वार यांसह इतर धार्मिक स्थळांसमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी श्रीराम नवमी शोभायात्रा समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, छावा संघटना, ब्राह्मण महासंघ, शीख बांधव तसेच जैन समाज बांधवांनी सहभाग घेतला होता.