भाजपच्या मताधिक्क्याचा आलेख पुन्हा उंचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 01:12 PM2019-05-25T13:12:03+5:302019-05-25T13:12:07+5:30
१९८९ मध्ये भाजपच्या पांडुरंग फुंडकरांनी प्रस्थापित केलेला रेकॉड २०१९ मध्ये संजय धोत्रे यांनी तोडला आहे.
- संजय खांडेकर
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजप मताधिक्क्याचा आलेख पुन्हा एकदा कमालीचा उंचावला आहे. १९८९ नंतर दुसऱ्यांदा अशा प्रकारच्या निकालाची पुनरावृत्ती २०१९ मध्ये दिसून आली आहे. प्रमुख लढतीमधील दोन दिग्गज पराभूत उमेदवारांच्या मतांची एकत्रित बेरीज करूनही ते भाजपच्या विजयी उमेदवारांच्या मताधिक्क्याचा आकडा गाठू शकले नाही. १९८९ मध्ये भाजपच्या पांडुरंग फुंडकरांनी प्रस्थापित केलेला रेकॉड २०१९ मध्ये संजय धोत्रे यांनी तोडला आहे. यंदाच्या अकोला लोकसभा निवडणूक निकालाने, १९८९ च्या लोकसभा निवडणूक निकालाची आठवण करून दिली आहे.
१९८९ मध्ये झालेल्या अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणूक रिंगणात भारिपचे अॅड. प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे मो. अजहर हुसेन आणि भाजपचे स्व. पांडुरंग फुंडकर होते. त्यावेळी फुंडकर ३,२२,३८४ मते घेऊन निवडून आले होते. तेव्हा हुसेन यांना १,७१,०३५ आणि अॅड. आंबेडकर यांना १,३०,२४२ मते पडली होती. हुसेन आणि आंबेडकर या दोन पराभूत उमेदवारांच्या मतांची संख्या ३,०१,२७७ एवढी होत होती. दोन्ही पराभूत उमेदवारांच्या मतांची संख्या फुंडकरांच्या ३,२२,३८४ मताधिक्क्याचा आकडा पार करू शकले नाही. त्यानंतर अशी स्थिती केवळ २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाली आहे. त्यामुळे कधी काळचा काँग्रेसचा असलेला बालेकिल्ला आता भाजपचा तर होत नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे. कारण भाजपच्या व्होट बँकेने मागील १९९१ ते २०१४ पर्यंतच्या मतविभाजनाची आतापर्यंतची सर्व समीकरणे बदलून टाकली आहे. या कार्यकाळात भाजपची व्होट बँक तेवढी सशक्त मुळीच नव्हती. मतांच्या विभाजनातून काँग्रेसला क्षीण करून भाजपने सत्ता मिळविली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भारिप (वंचित) ची आघाडी झाली तर अकोल्यातील भाजपचे उमेदवार निवडून येऊच शकत नाही, असे तेव्हा बोलले जायचे. त्याचे कारणही काहीसे तसेच होते. १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारिपच्या अॅड. प्रकाश आंबेडकरांनी काँँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांनी भाजपचे उमेदवार स्व. फुंडकरांचा दोनदा पराभव केला होता. त्यानंतर २००४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस, भारिप पुन्हा वेगवेगळ््या लढल्या आणि भाजपचे उमेदवार संजय धोत्रे सलग आतापर्यंत निवडून येत गेले. १९८९ नंतर भाजपला प्रथमच मतदारांनी भरभरून यंदा मतदान केले आहे. ही स्थिती आगामी २०२४ मध्ये कायम राहते की नाही, हे काळच ठरविणार आहे.
१९८९ ची निवडणूक
अजहर हुसेन (काँग्रेस) १,७१,०३५
प्रकाश आंबेडकर (भारिप) १,३०,२४२
पांडुरंग फुंडकर (भाजप) ३,२२,३८४
२०१९ ची निवडणूक
हिदायत पटेल (काँग्रेस) २,५४,३७०
प्रकाश आंबेडकर (वंचित) २,७८,८४८
संजय धोत्रे (भाजप) ५,५४,४४४