तीन हजार गावांच्या दुष्काळमुक्तीसाठी ‘बीजेएस’चा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 02:28 PM2018-04-19T14:28:23+5:302018-04-19T14:28:23+5:30
अकोला : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेंव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये श्रमदान पूर्ण करणाऱ्या तीन हजार गावांना भारतीय जैन संघटनेच्यावतीने जेसीबी व पोकलेन सारख्या अद्ययावत मशीन पुरविल्या जाणार आहेत.
अकोला : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेंव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये श्रमदान पूर्ण करणाऱ्या तीन हजार गावांना भारतीय जैन संघटनेच्यावतीने जेसीबी व पोकलेन सारख्या अद्ययावत मशीन पुरविल्या जाणार आहेत. अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात येत असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रा. सुभाष गादिया यांनी ओसवाल भवनातील पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षांपासून पाणी फाउंडेशनच्यावतीने वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे गावकºयांनी स्वत: या कार्यासाठी एकत्र यायचे, पाच लोकांना प्रशिक्षणाला पाठवायचे, आपल्या गावचा वॉटर शेड मॅनेजमेंट प्लॅन आपणच तयार करायचा व श्रमदानाने काम करून स्वावलंबी व्हायचे. गेल्या वर्षी ही स्पर्धा ३० तालुक्यांतील सर्व गावांमध्ये घेण्यात आली होती. या वर्षी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. ५९०० गावांनी या स्पर्धेत सहभागी होऊन प्रशिक्षण घेतले. यापैकी तीन हजार गावे तरी श्रमदानाचा टप्पा पूर्ण करतील. या तीन हजार गावातील लोक श्रमदान करणार आहेत. श्रमदानानंतर कठीण काम असणाºया गावातील काम नंतर मशीनद्वारे होणार आहे. खडक असलेल्या भागात जेसीबी किंवा पोकलेनद्वारेच काम करता येणार आहे. अशा ठिकाणी बीजेएसचा पुढाकार राहणार आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, पातूर, आणि बार्शीटाकळी या तालुक्यातील २३० गावे प्रशिक्षण घेऊन, या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. या सर्व गावांत भारतीय जैन संघटना विनामूल्य जेसीबी आणि पोकलेन पुरविणार आहे. जैन संघाने यासाठी पूर्णवेळ समन्वयक नेमले आहेत. अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी संतोष पवार, आदीनाथ पवार, संदीप मस्के आणि सहदेव सुर्वे यांची नियुक्ती केली आहे. पत्रकार परिषदेला भारतीय जैन संघटनेचे शीतल खाबिया, नरेश चौधरी, शैलेंद्र पारख, अमरीश पारेख, समीप इंदेने, विजय चौधरी, प्रवीण कर्नावट, प्रशांत कोठारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शांतीलाल मुथा २४ एप्रिल रोजी अकोल्यात
भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा पाणी फाउंडेशनच्या सभेसाठी मंगळवार, २४ एप्रिल रोजी अकोल्यात दुपारी ३.३० वाजता येणार आहेत. अकोला जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहितीदेखील येथे दिली गेली.