डॉलर, पाउण्ड, यूरोचा ब्रोकरकडून काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:46 PM2019-07-28T12:46:20+5:302019-07-28T12:47:07+5:30
राष्ट्रीयीकृत बँकेतील नाकर्तेपणाचा गैरफायदा अकोल्यातील ब्रोकर्स घेत असून, त्यात त्यांची मनमर्जी सुरू आहे. विदेशी चलनाच्या नावाखाली होत असलेली ही लूट जिल्हा प्रशासनाने थांबवावी, अशी मागणी होत आहे.
- संजय खांडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदेश यात्रा करणाऱ्या प्रवाशांना सुविधा असावी म्हणून राष्ट्रीयीकृत बँक आणि अधिकृत ब्रोकरकडूनच चलन घेतले पाहिजे, असे म्हटले जाते; मात्र राष्ट्रीयीकृत बँक आणि अधिकृत ब्रोकर्सकडे डॉलर, पाउण्ड आणि यूरोचे विदेशी चलन नाही; मात्र जिल्ह्यातील अनधिकृत असलेल्या दलालांकडे मुबलक पाहिजे तेवढा साठा आहे. त्यामुळे विदेश यात्रा करणाऱ्यांना पर्यायाने अव्वाच्या सव्वा कमिशनचे दर देऊन विदेश चलन घ्यावे लागत आहे.
अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातून विदेशागमन करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्या तुलनेत विदेशी चलन मिळण्याची व्यवस्था मात्र नाही. भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील सहा नंबर काउंटरवर विदेशी चलन सुविधा केंद्र आहे; मात्र येथे डॉलर, पाउण्ड आणि यूरोचे विदेशी कोणतेही चलन नाही. अकोल्यातील इतर राष्ट्रीयीकृत बँकेत तर अशा प्रकारची सेवादेखील नाही. एकीकडे हे चित्र असले तरी अकोल्यातील ब्रोकर्स यांच्याकडे मात्र डॉलर, पाउण्ड आणि यूरोचे विदेशी चलन मोठ्या प्रमाणात आहे.
राष्ट्रीयीकृत बँकेतील नाकर्तेपणाचा गैरफायदा अकोल्यातील ब्रोकर्स घेत असून, त्यात त्यांची मनमर्जी सुरू आहे. विदेशी चलनाच्या नावाखाली होत असलेली ही लूट जिल्हा प्रशासनाने थांबवावी, अशी मागणी होत आहे.
डागाळलेले डॉलर्स चालेना
भारतीय स्टेट बँकेत भारतीय किमतीचे जवळपास अडीच लाख रुपयांचे विदेशी चलनातील डॉलर्स पडून आहेत. या सर्व डॉलर्सवर कुंकवाचे, पेनाने लिहिल्याच्या खानाखुणा आहेत. डागाळलेले चलन असल्याने सदर डॉलर्स नाकारण्यात आले. त्यामुळे ते बँकेत अनेक महिन्यांपासून पडून आहेत. वºहाडातील शेगाव येथून सर्वात जास्त विदेशी चलनाचे व्यवहार होत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
बाजारदरापेक्षा जास्त दराने उलाढाल
विदेशी चलन मिळविण्यासाठी विदेशात जात असलेल्या ठिकाणाचे विमान तिकीट आणि पासपोर्ट अनिवार्य असते; मात्र या दोन्ही दस्तऐवजांशिवाय डॉलर, पाउण्ड आणि यूरोचे विदेशी चलन अकोल्यात सर्रास मिळत आहे. कोणत्याही दस्तऐवजाशिवाय विदेशी चलन मिळवून दिल्या जात असल्याने आजच्या बाजारदरापेक्षा महागात ते दिले जात आहे.