म्युकरमायकोसिसवरील औषधांचाही काळा बाजार; दुपटीच्या भावाने इंजेक्शनची विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 10:43 AM2021-05-20T10:43:06+5:302021-05-20T10:45:45+5:30

Akola News : रेमडेसिविर पाठोपाठ लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनचाही काळा बाजार सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Black market of drugs on mucomycosis; Selling injections at double the price! | म्युकरमायकोसिसवरील औषधांचाही काळा बाजार; दुपटीच्या भावाने इंजेक्शनची विक्री!

म्युकरमायकोसिसवरील औषधांचाही काळा बाजार; दुपटीच्या भावाने इंजेक्शनची विक्री!

ठळक मुद्देलिपोसोमल एम्फोटिसिरीन बी इंजेक्शनचा तुटवडाचार ते पाच हजार रुपयाला विक्री होत असल्याची माहिती

अकोला: रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळा बाजारानंतर आता म्युकरमायकोसिसवरील औषधांचाही काळा बाजार सुरू झाला आहे. म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळताच राज्यभरासह जिल्ह्यातही या रुग्णांची लुट सुरू झाली आहे. या आजाराच्या उपचारासाठी प्रभावी असलेले लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने दुपटीच्या दराने त्याची विक्री सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोल्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण कमी आहेत, मात्र ही या आजाराची सुरुवात असल्याने भविष्यात परिस्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत, मात्र खासगी रुग्णालयातील अशा रुग्णांची आकडेवारी अद्याप समोर आली नाही. अशा रुग्णांवर उपचारासाठी लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनचा वापर केला जात आहे, मात्र या इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे चित्र दिसून येत आहे. याचाच फायदा घेत काही जिल्ह्यात रेमडेसिविर पाठोपाठ लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनचाही काळा बाजार सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या इंजेक्सनची खरी किंमत दीड ते दाेन हजार रुपये आहे, मात्र बाजारात हे इंजेक्शन चार ते पाच हजार रुपयाला विक्री होत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे एकूण रुग्ण - १६

उपचार सुरू असलेले रुग्ण - ६

बरे झालेले रुग्ण - १०

इंजेक्शन, औषधं मिळेना

काळ्या बुरशीवर प्रभावी ठरत असलेल्या औषधांसह इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. नेहमीच्या तुलनेत या औषधांचा पुरवठाही कमी होत असल्याने तुटवडा निर्माण झाल्याचे औषध विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे, मात्र काही लोक याचा फायदा घेत जादा दराने या इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

खासगी रुग्णालयातील रुग्णांना म्युकरमायकोसिसवरील प्रभावी इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने शेजारील जिल्ह्यातील रुग्णांचे नातेवाईक अकोल्यात इंजेक्शनचा शोध घेत असल्याचे चित्र आहे.

ओठ, नाक, जबड्याला फटका

म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून, प्रामुख्याने याचा फटका ओठ, नाक आणि जबड्याला बसतो.

ओठ, नाक आणि जबड्याला पडलेली कोरड आणि त्यात बुरशीचा प्रादुर्भाव यामुळे सुरुवातीलाच हे तिन्ही अवयव प्रभावित होतात.

काळ्या बुरशीवर वेळीच उपचार न झाल्यास त्याचा फैलाव मेंदूपर्यंत होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

 

एका रुग्णाला ४० ते ५० डोस

म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनचा वापर प्रभावी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

रुग्णाला बुरशीचा किती प्रमाणात संसर्ग झालेला आहे, या नुसार त्याला इंजेक्शनची मात्रा चढविण्यात येते, मात्र ज्या रुग्णांना जास्त प्रमाणात संसर्ग झालेला आहे, अशा रुग्णांना ४० ते ५० डोस द्यावे लागतात.

 

तज्ज्ञ काय म्हणतात

 

घाबरू नका काळजी घ्या जिल्ह्यात म्युकरमायकोसिचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या औषधांचा तुटवडा भासत आहे. सर्वोपचार रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरू आहे. रुग्णांसह सर्वासामान्यांनी नाक आणि घशांची नियमित स्वच्छता ठेवावी.

- डॉ. पराग डोईफोडे, कान, नाक, घसा तज्ज्ञ, जीएमसी, अकोला

दातांची निगा राखा

कोरोनानंतर आता म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे, मात्र हा आजार सर्वांनाच होत नाही. त्यामुळे घाबरू नका. आजार टाळण्यासाठी दातांसह तोंडाची स्वच्छता आणि नाकाचीही स्वच्छता राखण्याची गरज आहे.

- डॉ. दिनेश नैताम, वैद्यकीय उपअधीक्षक, (दंतरोगतज्ज्ञ) जीएमसी, अकोला

Web Title: Black market of drugs on mucomycosis; Selling injections at double the price!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.