नोकरी लावून देण्याच्या नावावर गंडविले
By Admin | Published: December 30, 2014 01:11 AM2014-12-30T01:11:21+5:302014-12-30T01:11:21+5:30
सात जणांविरुद्ध आकोटात गुन्हा दाखल.
आकोट : येथील सहा ते सात युवकांना नोकरीचे खोटे नियुक्तिपत्र देत त्यांची प्रत्येकी चार लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी आकोट शहर पोलिसांत २९ डिसेंबर रोजी सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल उत्तम बेराड (रा.केशवराज वेटाळ) याच्यासह सहा ते सात युवकांजवळून आरोपींनी प्रत्येकी चार लाख रुपये घेऊन डिफेन्स रिसर्च अँन्ड डेव्हलपिंग ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, नेरी, नागपूर या ठिकाणी नोकरीवर लावून देण्याचे आमिष दिले. पैसे मिळाल्यानंतर त्यांना खोटे नियुक्तिपत्र देण्यात आले.
हा प्रकार खोटा असल्याचे उघडकीस आल्यानंतर आरोपींनी पैसे परत न करता, उलट युवकांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आकोट शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून आरोपी नितीन मोरे, सुरेश काळे, वैशाली मोरे, सूर्यप्रकाश मोरे, दीपक जगताप, उमेश मोरे, डॉ. महेश गायकवाड (सर्व रा. आकोट) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४२0, ४६८, ५0६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एपीआय नितीन पाटील करीत आहेत.