नेत्रहिन धनश्रीचे ‘नेत्रदीपक’ यश...बारावीत ९२ टक्के गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 04:41 PM2019-05-28T16:41:26+5:302019-05-28T17:04:17+5:30
जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासच निर्माण करीत चक्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत डोळस शाळेत शिकत तिने बारावीच्या २०१९ च्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळविले आहेत.
- विजय शिंदे
अकोट : दोन्ही डोळ्यांनी जन्मापासून अंध असलेल्या अकोटच्या धनश्री हागे या विद्यार्थीनीने शिक्षणात मात्र इंद्रधनुषी रंगांची उधळण करीत नेत्रदीपक यश मिळविले आहे. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासच निर्माण करीत चक्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत डोळस शाळेत शिकत तिने बारावीच्या २०१९ च्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळविले आहेत.
अकोट येथील जलतारे प्लॉट येथील सोनल व अशोक हागे यांची मुलगी धनश्री ही जन्मत:च अंध आहे. तीने सूर्योदय आणि सूर्यास्त कधी पाहिला नाही. धनश्रीच्या दोन्ही डोळ्यात रेटिना नसल्याने तिच्यावर कोणताही उपचार शक्य नाही. मात्र तिच्या संवेदनेने आलौकिकतेचे दर्शन घडावे, असे कर्तृत्वतीने बारावीचे कला शाखेच्या परिक्षेत घडविले आहे. अकोट येथील भाऊसाहेब पोटे कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेत तीने कुठल्याही प्रकारचा कमीपणा न वाटू देता डोळस विद्यार्थ्यांसोबत वर्षभर जिद्दीने अभ्यास केला. बारावीची परिक्षा दिली असता २०१९ बारावीच्या निकालात तीला ६५० पैकी ५९८ गुण मिळाले. या मध्ये इंग्रजी ८४, मराठी ८९, इतिहास ९३, राज्यशास्त्र ९१, अर्थशास्त्र ९५, सहकार ९८, पर्यावरण ४८, गुण प्राप्त केले आहेत. अंध असल्याने तीने ११ वी कला शाखेचे पुजा इंगळे हीने लेखणीक म्हणुन मदत केली. तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
धनश्री आई-वडीलांच्या सहकार्याने धनश्री पहिल्या वर्गापासुनच सर्वसामान्य डोळस विद्यार्थ्यांसोबत शिकून प्रथम क्रमांकावर राहिली. अकोट येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कोणत्याही अंध विद्यालयात व ब्रेंल लिपीच्या माध्यमातून न जाता स्थानिक नरसिंग विद्यालयामध्ये आठव्या वर्गात प्रवेश घेतला होता.विद्यालयातुन दहावीच्या परीक्षेत तिने ९४.८० टक्के गुण मिळवित घवघवीत यश संपादन केले होते. विद्यार्थीकरीता असलेल्या संगणकावर अभ्यास केला. बारावीच्या अभ्यासक्रमाच्या रेकॉर्डेड सिडी ऐकुण नंतर पाठातर करून घेण्याकरिता आई-वडीलांनी मेहनत घेतली. दररोज सतत तीन तास अभ्यास करून घेणे, शाळेत सोडणे, आणणे आदींसह तिला सर्वतोपरीने आई-वडील मदत करीत गेल्याने कधीही आपण अंध असल्याचा आभास झाला नसल्याचे धनश्रीने सांगितले. धनश्रीला गायन, संगीत व नृत्याची आवड आहे. अतिशय बोलकी असल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यासोबत शिकत असताना, वावरत असताना तिला कधी आपण अंध असल्याचे जाणवले नाही. बारावी शिक्षणाकरिता तिला आई-वडीलांसोबतच शिक्षण संस्थाचे अध्यक्ष भाऊसाहेब पोटे,सचिव शिरीष पोटे, प्राचार्य प्रविण रावणकर, वर्गशिक्षीका सुनिता अमृतकर व शिक्षकांनी चांगले मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
धनश्रीला व्हायचेय जिल्हाधिकारी
धनश्रीला यूपीएससी करून जिल्हाधिकारी व्हायचे आहे. माझ्याच सारख्या अनेक अंध मुली व समाजाची सेवा करायची आहे. जगात अशक्य काहीही नाही. मनात ध्यास जर घेतला तर आपले ध्येय निश्चितच गाठता येते. असा विश्वास धनश्रीने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.