उमेदीपुढे अंधत्वही झुकले!
By admin | Published: August 10, 2014 06:29 PM2014-08-10T18:29:10+5:302014-08-10T18:29:10+5:30
दोघा भावांनी नियतीपुढे हार न पत्करता अंधकारमय जीवनात आशेचा किरण शोधला आहे.
उमेदीपुढे अंधत्वही झुकले! ब्रह्मनंद जाधव ल्ल मेहकर (जि. बुलडाणा) बालवयातच अंधत्व आलेल्या दोघा भावांनी नियतीपुढे हार न पत्करता अंधकारमय जीवनात आशेचा किरण शोधला आहे. त्यांची धडपड आणि यातून त्यांनी उभा केलेला लघुउद्योग सर्वांंसाठीच प्रेरणादायी आहे. मेहकर येथील जितेंद्र भास्कर मिनासे आणि संजय भास्कर मिनासे या भावंडांची दृष्टी वयाच्या अनुक्रमे १४व्या व १५व्या वर्षी अचानक अधू झाली. पालकांनी दोघांवरील उपचारासाठी शक्य ती सर्व धावपळ केली; मात्र दुर्दैवाने औषधोपचारानंतरही या भावंडांना पूर्णत: अंधत्व आले. वयाच्या पंधरा वर्षांपर्यंंत जग पाहिल्यानंतर आलेले अंधत्व हे कुणाचेही उमेद हरविणारेच होते; मात्र या भावंडांनी खचून न जाता वडिलांना पशुखाद्य व धान्य विक्रीच्या व्यवसायात मदत करणे सुरू केले. दोघांनीही इयत्ता दहावीची परीक्षा लेखनिकाच्या मदतीने उत्तीर्ण केली. त्यानंतर जितेंद्रने वडिलांच्या व्यवसायाची जबाबदारी खांद्यावर घेतली, तर संजयने शालेय साहित्य विक्रीचे दुकान थाटले. अंधत्वावर मात करून दोघाही भावांनी व्यापारात जम बसविला. त्यांनी पाणी साठवण्याच्या टाक्यांच्या निर्मितीचा लघुउद्योग मेहकरमध्ये सुरू केला. त्यांचे उत्पादन विदर्भासह मराठवाड्यातही जात आहे. आकारावरून ओळखतात पैसे : जितेंद्र व संजय मिनासे हे अंध असले तरी, व्यापार करताना येणार्या अडचणींवर त्यांनी लिलया मात केली. पैशाच्या आकारावरून ते किती रुपये आहेत, हे ते सहज ओळखतात. पैशावर त्यांचा हात एवढा बसला आहे की, कितीही मोठी रक्कम ते अचूक मोजतात.
** अनेकांना दिला रोजगार
अंध बंधूंनी पाण्याच्या टाक्यांच्या निर्मितीचा लघुउद्योग सुरू करून, त्याद्वारे अनेकांना रोजगार मिळवून दिला. या उद्योगासाठी त्यांनी कोणतीही शासकीय मदत घेतली नाही!