जिल्ह्यातील रक्तपेढ्या ऑक्सिजनवर, चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:18 AM2021-04-04T04:18:55+5:302021-04-04T04:18:55+5:30
शासकीय रक्तपेढी फेब्रुवारी, मार्च महिन्यात जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक रक्तदाते स्वत:हून रक्तदान करण्यास ...
शासकीय रक्तपेढी
फेब्रुवारी, मार्च महिन्यात जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक रक्तदाते स्वत:हून रक्तदान करण्यास टाळत असल्याचे दिसत आहे. शासकीय रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे घेण्यात येत असल्याने काही प्रमाणात रक्ताचा साठा उपलब्ध आहे. मात्र, हा साठा तीन ते चार दिवस पुरेल एवढाच आहे. येत्या काळात लसीकरणाचाही प्रभाव रक्त संकलनावर दिसण्याची शक्यता आहे. परंतु, रक्तदात्यांनी लस घेण्यापूर्वीच रक्तदान करावे, असे आवाहन शासकीय रक्तपेढीचे विभागप्रमुख अजय जुनगरे यांनी लोकमतच्या माध्यमातून केले आहे.
हेडगेवार रक्तपेढी
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनच रक्त संकलनावर परिणाम झाला होता. मात्र, दिवाळीनंतर परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली होती. फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने त्याचा परिणाम रक्त संकलनावर झाला. मार्च महिन्यात रक्तदान शिबिरे झाली नाहीत. त्यामुळे शहरातील बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये ठणठणाट आहे. कोविड लसीकरणाचा परिणाम आतापर्यंत रक्तपेढ्यांवर झाला नाही. मात्र, येत्या काळात हा परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे, असे आवाहन हेडगेवार रक्तपेढी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
अकोला ब्लड बँक
फेब्रुवारी महिन्यात शिवजयंतीनिमित्त काही रक्तदान शिबिरे घेण्यात आल्याने मार्च महिन्यात काही प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध होता. मात्र, आता परिस्थिती गंभीर आहे. सद्यस्थितीत रक्तपेढीत दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. कोविडचा शिरकाव होण्यापूर्वी जिल्ह्यात मोठे रक्तदान शिबिरे व्हायची. त्यामुळे मुबलक रक्तसाठा उपलब्ध असायचा, मात्र आता परिस्थिती विपरीत असल्याची माहिती अकोला ब्लड बँकतर्फे देण्यात आली आहे.
लसीकरणाआधी करा रक्तदान
कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने अनेक रक्तदाते भीतीपोटी रक्तदान टाळत आहेत. शिवाय, आता कोविड लस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करणे शक्य नाही. त्यामुळे रक्तपेढ्यांची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती पाहता रक्तदात्यांनी विशेष खबरदारी घेत रक्तदान करावे. तसेच जे रक्तदाते लस घेणार आहेत, त्यांनी लस घेण्यापूर्वीच रक्तदान करावे, असे आवाहन रक्तदाते पराग गवई यांनी केले आहे.