‘लॉकडाऊन’च्या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भागविली रक्ताची उणिव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:26 PM2020-04-25T17:26:38+5:302020-04-25T17:26:43+5:30
रक्ताचा तुटवडा जाणवणार होता; मात्र ही उणिव प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी रक्तदान करून भरून काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २५ मार्चपासून संपूर्ण जिल्हा ३ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ करण्यात आला. यासह संचारबंदी लागू झाल्याने गर्दी टाळण्यास्तव ३९ दिवस खासगीत होणारी रक्तदान शिबिरे रद्द करण्यात आली. यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवणार होता; मात्र ही उणिव प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी रक्तदान करून भरून काढली. तथापि, उपलब्ध रक्तसाठा ३० एप्रिलपर्यंत पुरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अपघातग्रस्त रुग्ण आणि गर्भवती महिलांना प्रामुख्याने रक्ताची गरज भासते; मात्र संचारबंदी व ‘लॉकडाऊन’च्या काळात रक्तदान शिबिरे आयोजित केल्यास नियमाचा भंग होऊन परिस्थिती बिघडू शकते, ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरावरील प्रशासकीय कार्यालयांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करून अधिकारी, कर्मचाºयांना रक्तदान करायला लावावे, असा निर्णय घेतला. त्याची २६ मार्चपासून ३० मार्चपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालयासह सहाही तहसील कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचाºयांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यामाध्यमातून विविध रक्त गटाच्या २१२ रक्त पिशव्या गोळा झाल्या. एवढे रक्त एप्रिल महिन्याअखेर पुरणार असल्याने काही शिबिरे त्यावेळी रद्द करून २५ एप्रिलनंतर घेण्याचे ठरविण्यात आले. तथापि, अधिकारी आणि कर्मचाºयांच्या पुढाकारामुळे ‘लॉकडाऊन’च्या काळातही रक्ताची उणिव भासली नसल्याने या उपक्रमाप्रती नागरिकांमधून शासनाचे कौतुक होत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात गत काही दिवसांपासून शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे ब्लड बँकेत रक्त साठा उपलब्ध आहे; असे असले तरी ‘निगेटिव्ह’ रक्त गटाची उणिव भासत आहे. त्यामुळे पुन्हा एकवेळ प्रशासकीय पातळीवर रक्तदान शिबिरांचे नियोजन करण्याची बाब विचाराधिन आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली.