रक्तदानातून वाहिली बाबासाहेबांना आदरांजली!
By admin | Published: December 7, 2015 02:16 AM2015-12-07T02:16:09+5:302015-12-07T02:16:09+5:30
१२५ जणांनी केले रक्तदान, तर ३५0 जणांनी केली सिकलसेल तपासणी.
अकोला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी अशोक वाटिका परिसरात रक्तदान तसेच सिकलसेल तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी तब्बल १२५ रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली तर, ३५0 नागरिकांनी सिकलसेल आजाराची प्राथमिक तपासणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे दरवर्षी अशोक वाटिका येथे रक्तगट तपासणी व रक्तदान, तसेच सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. रविवारी अशोक वाटिका येथे शिबिराच्या प्रारंभी भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळय़ाला हारार्पण करून त्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. घोरपडे, डॉ. सराटे, डॉ. जुनघरे, संजय देशमुख, डॉ. अतराम, डॉ. देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान व रक्तगट तपासणीची सुविधा अशोक वाटिका सभागृहामध्ये करण्यात आली होती. या ठिकाणी अठरा वर्ष वयोगटावरील तब्बल १२५ रक्तदात्यांनी रक्तगट तपासणी करून रक्तदान केले. तसेच सिकलसेल तपासणीसाठी अशोक वाटिका परिसरात शिबिर घेण्यात आले. यावेळी लहान-मोठय़ा ३५0 जणांनी सिकलसेलची तपासणी करून घेतली. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी सहकार्य केले. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय खडसे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, अँड. मोतीसिंह मोहता, पोलीस निरीक्षक इंगळे, पोलीस निरीक्षक अढाऊ, आदींनी शिबिराला सदिच्छा भेट दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीचे समुपदेशक ज्योती गवई, शिल्पा तायडे, पाटणकर, गाडवे, नवरखडे तसेच सत्यजित आवळे, सोहम कुळकर्णी, प्रतुल वीरघट, दीपक खंडारे, धर्मेंद्र शिरसाट, पराग गवई आदींनी परिश्रम घेतले.