'सर्वोपचार'मध्ये रक्ताचे नमुने पुन्हा बेवारस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 06:18 PM2019-03-18T18:18:00+5:302019-03-18T18:18:06+5:30
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पुन्हा एकदा रक्ताचे नमुने बेवारस आढळून आले आहेत.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पुन्हा एकदा रक्ताचे नमुने बेवारस आढळून आले आहेत. यापूर्वी लोकमतने २२ फेब्रुवारी रोजी हा प्रकार उघडकीस आणला होता. त्यामुळे खळबळून जागे झालेल्या जीएमसी प्रशासनातर्फे विशेष दक्षता घेण्यात आली होती. परंतु, काही दिवसांतच परिस्थितीत जैसे थे झाल्याने येथील गलथान कारभाराचे वास्तव समोर आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल रुग्णांच्या आजाराचे योग्य निदान व्हावे, म्हणून चाचणीसाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. नियमानुसार हे नमुने तपासणीसाठी येथील पॅथॉलॉजीमध्ये जाणे आवश्यक आहे; मात्र वास्तविकतेमध्ये रक्ताचे हे नमुने आपत्कालीन पॅथॉलॉजीच्या बंद खिडकीबाहेर चक्क बेवारस ठेवण्यात येत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. यापूर्वी देखील लोकमतने २२ फेब्रुवारी रोजी पॅथोलॉजीच्या बंद खिडकी बाहेर बेवारस रक्ताचे नमुने असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला होतो. त्यामुळे जीएमसी प्रशासन खळबळून जागे झाले होते. या प्रकरणी संबंधीतांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांसोबत येणाऱ्या चिमुकल्यांसाठी हा प्रकार घातक असून, नमुन्यावरील लेबल बदलण्यात आल्यास रुग्णावर चुकीचा उपचार होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.