रक्ताचे नातेही गोठले; स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 11:09 AM2021-05-23T11:09:11+5:302021-05-23T11:12:48+5:30
Akola News : सर्वाधिक अंत्यसंस्कार होत असलेल्या मोहता मिल स्मशानभूमीमध्ये राखेचे ढीग जमा होत आहेत.
अकोला : कोरोनामुळे मृतांची संख्या वाढली असतानाच स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील सर्वाधिक अंत्यसंस्कार होत असलेल्या मोहता मिल स्मशानभूमीमध्ये राखेचे ढीग जमा होत आहेत. कर्मचाऱ्यांनाच त्या राखेवर सोपस्कार पार पाडावे लागत आहेत.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अकोला शहरात मनपाच्या मार्गदर्शनात कच्छी मेमन जमातच्या पथकाकडून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. पीपीई किट घालणाऱ्या नातेवाइकांनाच अग्नी देण्याची परवानगी दिली जात आहे. त्यातच अंत्यविधीला सोडाच पण मृतांची अस्थी व राख घेण्यासाठीसुद्धा नातेवाईक येत नसल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीपेक्षा आता परिस्थिती बदलत आहे. नातेवाईक अस्थी घेण्यासाठी येऊ लागले आहेत. पण, राख मात्र संसर्गाच्या भीतीने स्मशानभूमीतच सोडून जात आहेत तर काही जण राखेने नदी दूषित होईल, म्हणून राख स्मशानभूमीतच ठेवत आहेत. शहरातील मोहता मिल स्मशानभूमीत ही स्थिती जास्त गंभीर आहे. येथे मृतकांवर अंत्यसंस्कार झाल्यावर नातेवाईक राख नेत नसल्याने राखेचे ढिगारे साचत आहेत. मोठ्या प्रमाणात पोतळ्या राखेने भरून ठेवाव्या लागत आहेत. ही राख कर्मचाऱ्यांनाच नदीत नेऊन टाकावी लागत आहे. तर उर्वरित स्मशानभूमीत राख ठेवून गेल्याची स्थिती क्वचितच उद्भवत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मोहता मिल स्मशानभूमी
सुरुवातीपासून मोहता मिल स्मशानभूमीमध्ये कोरोना मृतकांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. याच स्मशानभूमीमध्ये सर्वाधिक कोरोना मृतकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. येथे अंत्यसंस्कार केल्यानंतर काही नातेवाईक राख घेऊन जात नाहीत. त्यामुळे येथे ५०-६० पोतळ्या भरून राख शिल्लक आहे.
सिंधी कॅम्प स्मशानभूमी
मोहता मिलमध्ये जागा कमी पडल्यास सिंधी कॅम्प स्मशानभूमीमध्ये कोरोना मृतकांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. या ठिकाणी दररोज ४-५ कोरोना मृतकांवर अंत्यसंस्कार होत आहेत; मात्र एकाही मृतकाची राख शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले.
मोठी उमरी स्मशानभूमी
कोरोना मृतकांवर अंत्यसंस्कार करण्यात येणाऱ्या तीन स्मशानभूमींपैकी मोठी उमरी येथील स्मशानभूमी आहे. येथे पहिल्या लाटेत कोरोना मृतकांवर अंत्यसंस्कार कमीच होत होते; मात्र आता वाढ झाली आहे. मात्र एकाही मृतकाची राख येथे शिल्लक नाही.
अस्थींचे नदीत विसर्जन
सध्या बाहेर फिरण्यावर निर्बंध असल्याने अनेक जण अस्थी घेऊन जात नाहीत. त्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी जाता येत नसल्याने अडचण आहे; परंतु मोहता मिल स्मशानभूमीमध्ये कर्मचारी स्वत: ती राख नदीत नेऊन टाकत आहेत. इतर स्मशानभूमीत कोणी राख नेणारे असल्यास त्यांच्याजवळ ती देण्यात येत आहे.
बाहेरगावातील कोरोनाबाधिताचे शहरात निधन झाले, तर त्याचे नातेवाईक अस्थी नेत नाहीत, अशा अस्थींच्या पोतळ्या भरून ठेवाव्या लागत आहेत. ही राख नदीत नेऊन टाकत आहोत. आतापर्यंत ५००-६०० पोतळ्या राख विसर्जित केली आहे. राखेतून कोरोना होत नाही, त्यामुळे न घाबरता राख घेऊन जावी.
- दीपक शिंदे, कर्मचारी, मोहता मिल
सुरुवातीला लोकांना कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यास भीती वाटत होती; परंतु आता कोणीच भीत नाही. राखही ठेवत नाहीत. असा एखादाच प्रसंग उद्भवतो. कोणी राख नदीत विसर्जित करण्यासाठी जात असल्यास पडून असलेली राखही ती व्यक्ती घेऊन जाते.
- दीपक अरखराव, कर्मचारी, सिंधी कॅम्प स्मशानभूमी
या स्मशानभूमीत कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार कमी होतात. अद्याप कोणी राख ठेवून गेल्याची स्थिती निर्माण झाली नाही. मृतकाचे नातेवाईक त्यांची राख घेऊन जातात. पूर्णपणे सगळे सोपस्कार पार पाडले जात आहेत. स्मशानभूमीत राख शिल्लक नाही.
- शंकर सावळे, कर्मचारी, मोठी उमरी स्मशानभूमी