महापालिकेचा महासंग्राम सुरू !
By Admin | Published: January 12, 2017 02:30 AM2017-01-12T02:30:42+5:302017-01-12T02:30:42+5:30
हद्दवाढीनंतर पहिलीच निवडणूक; २0 प्रभागांमध्ये रंगणार सामना
अकोला, दि. ११- महापालिकेची निवडणूक म्हणजे राजकीय पक्षांसाठी सिंहस्थ कुंभमेळ्यासारखी पर्वणीच मानल्या जाते. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी मनपा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू केल्यानंतर भाजपा-शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भारिप-बहुजन महासंघ आदी प्रमुख राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत. २१ फेब्रुवारी रोजी मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया होणार असून, २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी व निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तोपर्यंत राजकीय पक्षांमध्ये युती व आघाडी करण्याच्या मुद्यावरून निर्माण होणार्या राजकीय घडामोडींनी वातावरण पूर्णत: ढवळून निघेल, हे निश्चित आहे. एकमेकांच्या पक्षातील नगरसेवकांसह पदाधिकारी-कार्यकर्त्यांना पक्षात ओढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महापालिकेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय सारिपाटावर यशस्वी चाली खेळून अखेरच्या क्षणी कोण बाजी मारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.