प्रशासकीय व आर्थिक गैरव्यवहारामुळे संचालक मंडळ बरखास्त - गावंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:17 AM2021-04-25T04:17:56+5:302021-04-25T04:17:56+5:30
अकोट : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासकीय व आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी ...
अकोट : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासकीय व आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी घेऊन बाजार समितीत गेलो असता, खोटे गुन्हे दाखल केले, परंतु या माध्यमातून घटनेची तत्काळ दखल घेत शिवसेनेचे शेतकरी नेते दिवाकर रावते यांनी केवळ दोनच दिवसात शासन दरबारी मुदतवाढीचा प्रस्ताव असलेले संचालक मंडळ बरखास्त करुन दाखवले, अशी माहिती शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
माजी आमदार गावंडे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन बाजार समितीत जाब विचारायला गेलो असता, शेतकऱ्यांच्या समस्यांवर कोणीही समाधानकारक उत्तरे न देता अरेरावी करायला लागले. जनतेचे काम करत नाही, याच मुद्द्यावर बाचाबाची झाल्याची कबुली सहसचिवांनी फिर्यादीत दिली आहे. परंतु, दि. १७ एप्रिल रोजी खोटे गुन्हे दाखल करुन पोलिसांनी १८ एप्रिल रोजी अटक केली; मात्र या घटनेची दखल शिवसेनेचे शेतकरी नेते दिवाकर रावते यांनी घेतली. दुसरीकडे आर्थिक वर्षातील अंकेक्षण टिपणीतील बाजार समितीत झालेल्या गैरव्यवहाराची माहिती जिल्हा निबंधकांनी दिली होती. तरीही विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पडून होता. संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची तयारी असतानाच शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी बाजार समितीमधील घडलेला प्रकार संबंधित विभागाच्या निदर्शनाला आणून दिला. त्यानंतर दोन दिवसातच दि. १९ एप्रिल रोजी संचालक मंडळ बरखास्तीचा आदेश संबंधित विभागाला काढण्यास दिवाकर रावते यांनी भाग पाडल्याचे शिवसेनेचे माजी आमदार गावंडे यांनी पत्रकारांना सांगितले. अनेक वर्षांपासून काहीजण बाजार समितीमधील गैरव्यवहाराच्या तक्रारी, चौकशीसाठी तगादा लावून होते. आता केवळ दोन दिवसात संचालक मंडळाला मुदतवाढ न देता, बाजार समितीवर तत्काळ प्रशासकाची नियुक्ती करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. बाजार समितीमधील गैरव्यवहार तसेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करुन अटक करण्यासाठी धडपडणारे लवकरच जनतेसमोर उघडे पडणार असल्याचेही माजी आमदार गावंडे म्हणाले.