मृतदेह बैलबंडीतून न्यावा लागतो दुसऱ्या गावात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:17 AM2021-07-25T04:17:22+5:302021-07-25T04:17:22+5:30
संजय सपकाळ मुंडगाव : अकोट तालुक्यातील गट ग्राम पंचायत मुंडगाव अंतर्गत येत असलेल्या अमिनापूर येथे स्मशानभूमीच नसल्याने ग्रामस्थांना पावसाळ्याच्या ...
संजय सपकाळ
मुंडगाव : अकोट तालुक्यातील गट ग्राम पंचायत मुंडगाव अंतर्गत येत असलेल्या अमिनापूर येथे स्मशानभूमीच नसल्याने ग्रामस्थांना पावसाळ्याच्या दिवसात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्ते चिखलमय झाल्याने मृतदेह अंत्यविधीसाठी बैलबंडीतून मुंडगाव येथील स्मशानभूमीत न्यावा लागतो. गत काही वर्षांपासून हीच परिस्थिती असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. दरम्यान, अमिनापूर येथील वृद्ध महिलेचा २४ जुलै रोजी मृत्यू झाला. गावात स्मशानभूमी नाही, पावसाळ्यात रस्त्यांची दुर्दशा, त्यामुळे नागरिकांनी बैलबंडीच्या साहाय्याने मृतदेह मुंडगाव येथील स्मशानभूमीत नेला. मृत्यूनंतरही अवहेलना होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
अमिनापूर येथील लीलाबाई जामाजी घनबहादुर (९०) यांचे २४ जुलै रोजी निधन झाले. गावात स्मशानभूमी नाही, तसेच पावसामुळे रस्त्याची दुर्दशा झाली, अशातच चंद्रिका नदीला जवळपास तीन-चार फूट पाणी असल्यामुळे अंत्यसंस्कार कुठे करावे, असा प्रश्न लीलाबाई घनबहादूर यांच्या नातेवाइकांना पडला. अंत्यसंस्कारासाठी गावात कुठलीही व्यवस्था नसल्याने अमिनापूरवासीयांनी नाइलाजास्तव मृतदेह चक्क बैलबंडीच्या साहाय्याने मुंडगाव येथे नेला. त्यानंतर मुंडगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (फोटो)
-----------------------------------
मृत्यूनंतरही मृतदेहाची अवहेलना
अमिनापूर येथे स्मशानभूमीच नसल्याने ग्रामस्थ गावाशेजारील शेतात अंत्यसंस्कार करतात; मात्र पावसाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अंत्यविधीसाठी मृतदेह नेताना मृत्यूनंतरही अवहेलना होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांसह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
------------------------
मी ६० वर्षांचा झालो असून, अद्यापही गावात स्मशानभूमी पाहिली नाही. भर पावसात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पाऊस सुरू असतानाही गावात अंत्यविधीसाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने नदीच्या पुरातून मृतदेह बंडीच्या साहाय्याने दुसऱ्या गावात (मुंडगाव) नेला.
-तोताराम सरकटे, नातेवाईक
-----------------------------