पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2016 12:20 AM2016-06-30T00:20:23+5:302016-06-30T00:20:23+5:30
सोमवारी बेंबळा नदीला आलेल्या पुरात संग्रामपूर तालुक्यातील युवक बेपत्ता झाला होता.
जामोद (जि. बुलडाणा) : बेंबळा नदीला आलेल्या पुरात सोमवारी वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह दोन दिवसानंतर संग्रामपूर तालुक्यातील भोन येथे खडकी नाल्यात सापडला.
जळगाव तालुक्यात रविवारी रात्री व सोमवारी दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला. दरम्यान, जामोद येथील ३0 वर्षीय युवक वसंता रमेश बोबडे हा बेंबळा नदीच्या पुलावर उभा असताना पुलावर अचानक पाणी वाढल्याने पुरात वाहून गेला. ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला मात्र कोठेही पत्ता लागला नाही.
जळगाव जामोदचे तहसीलदार अनिल हेळकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच नदीपात्राची पाहणी करून वसंता बोबडेचा शोध घेतला. दुसर्या दिवशीही तलाठी, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी नदीपात्राची पाहणी केली. मात्र वाहून गेलेल्या युवकाचा शोध लागला नाही. बुधवारी संग्रामपूर तालुक्यातील भोन येथील खडकी नाल्यामध्ये या युवकाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी संग्रामपूर येथे पाठविण्यात आला आहे.