अखेर दोन दिवसानंतर सापडला पुरात वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 10:57 AM2020-07-27T10:57:07+5:302020-07-27T10:57:22+5:30
दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर रविवार दोनवाडा गावानजीक त्यांचा मृतदेह सापडला.
मूर्तिजापूर : तालुक्यातील एंडली येथील दादाराव वानखडे (वय ६०) हे २४ जुलै रोजी पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेले होते. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर रविवार दोनवाडा गावानजीक त्यांचा मृतदेह सापडला.
एंडली येथील दादाराव वानखडे (वय ६०) हे म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेले असता २४ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान, पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेले होते. याबाबत तहसीलदारांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली. संत गाडगेबाबा पथकाने २५ जुलैपासून शोध मोहीम सुरू केली. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर रविवार, २६ जुलै रोजी दुपारी पुरात वाहून गेलेल्या दादाराव वानखडे यांचा दोनवाडा गावानजीक मृतदेह सापडला संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे अंकुश सदाफळे, विकी साटोटे, अतुल उमाळे, ऋषिकेश तायडे, धीरज आटेकर, बबलू पवार आणि दोनवाडा येथील श्रीकृष्ण झटाले, प्रमोद आडे, देवानंद झटाले, संतोष आडे, भगवान जामनिक, पवन झटाले, वैभव बचे यांनी मृतदेह शोधला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने दोनवाडा येथे आणण्यासाठी पथकातील जवानांना कसरत करावी लागली. गत दोन दिवसांपासून पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात शोध मोहीम सुरू होती. रविवारी सकाळपासूनच दोन रेस्क्यू बोटने एंडलीपासून शोध सुरू केला. रेस्क्यू बोट लाखपुरीपर्यंत येताच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या टीम व दोनवाडा येथील नागरिक यांच्या मदतीने मृतदेह सापडला. या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, एसडीओ मोहिते, तहसीलदार पवार, नायब तहसीलदार डाबेराव, माना पोलीस स्टेशनचे पी.आय. खंडारे, एंडलीचे तलाठी हे लक्ष ठेवून होते.