विद्रुपा नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 03:02 PM2019-08-11T15:02:24+5:302019-08-11T15:03:36+5:30
मृतदेह तेल्हारा तालुक्यातील मनात्री गावाजवळच्या विद्रुपा नदीपात्रात पुलानजीक आढळून आला.
तेल्हारा : तालुक्यातील पंचगव्हाण (उबारखेड)येथील विद्रुपा नदीच्या पुरात शुक्रवारी वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह रविवार, ११ आॅगस्ट रोजी दुपारी मनात्री येथील पुलाजवळ आढळून आला. प्रशांत बाळकृष्ण गवारगुरु (३५)असे मृतकाचे नाव असून, शोध मोहिमेदरम्यान त्यांचा मृतदेह तेल्हारा तालुक्यातील मनात्री गावाजवळच्या विद्रुपा नदीपात्रात पुलानजीक आढळून आला.
उबारखेड येथील प्रशांत बाळकृष्ण गवारगुरू हा युवक शुक्रवार, ९ आॅगस्ट विद्रुपा नदीवरील पुलावर पूर पाहण्यासाठी आला होता. यावेळी पुलावरून पाय घसरल्याने तो पुरात पडला. या घटनेची माहिती मिळताच तेल्हारा तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर व तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन शोध मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. पुरात वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्यासाठी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकास पाचारण करण्यात आले. पथकासह ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली होती. दोन दिवस शोधमोहिम सुरुच होती. अखेर रविवारी दुपारी मनात्री येथील पुलानजीक प्रशांत गवारगुरु यांचा मृतदेह आढळून आला. तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांच्या मार्गदर्शनात संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे दिपक सदाफळे यांच्या नेतृत्वात त्यांचे सहकारी विकी साटोटे, महेश साबळे, अंकुश सदाफळे, ऋषीकेश तायडे, राजेश इंगळे, चेतन इंगळे, ऋषीकेश राखोंडे, सुरज ठाकुर, आशिष गुगळे, मयुर सळेदार, मयुर कळसकार, गौरव ठाकरे,ऋत्विक सदाफळे यांनी ही शोधमोहिम राबविली.