पूर्णा नदीच्या पात्रात काठावर बांधून ठेवलेला मृतददेह पुन्हा पुरात वाहून गेला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:20 AM2021-09-03T04:20:17+5:302021-09-03T04:20:17+5:30
पूर्णा नदी पात्रात एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे शेतकऱ्यांना दिसले. याबाबत उपसरपंच राजेश्वर वैराळे यांनी उरळचे ठाणेदार अनंतराव वडतकार ...
पूर्णा नदी पात्रात एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे शेतकऱ्यांना दिसले. याबाबत उपसरपंच राजेश्वर वैराळे यांनी उरळचे ठाणेदार अनंतराव वडतकार यांना माहिती दिली. ठाणेदार वडतकार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून हातरुण पोलीस चौकीचे बिट जमादार विजय झाकर्डे, पोलीस कर्मचारी रघुनाथ नेमाडे यांना तातडीने घटनास्थळी पाठविले. पोलीस कर्मचारी विजय झाकर्डे, रघुनाथ नेमाडे यांनी बोरगाव वैराळेचे पोलीस पाटील भारत कोकाटे व गावातील काही तरुणांना घेऊन पूर्णा नदी पात्रात तरंगत असलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला आणि रात्री एका झाडाला बांधून ठेवला होता. हा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याला शवविच्छेदनासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्याची गरज होती. परंतु या पोलीस कर्मचाऱ्यांनी तसे न करता, वेळाकाढू धोरण स्वीकारत, मृतदेह नदीच्या काठावर असलेल्या एका झाडाला रात्री बांधून ठेवून रात्री घरी निघून गेले. यानंतर रात्री पूर्णा नदीला पूर आल्यामुळे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पुरात वाहून गेला. मृतदेह रात्रीच अकोला येथे उत्तरीय तपासणीस पाठविला असता तर तो मृतदेह वाहून गेला नसता. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीचा फटका आता पोलीस यंत्रणेला सहन करावा लागणार आहे. मृतदेहाचा पुन्हा शोध घेण्यात यंत्रणा कामी लागली आहे.
त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार?
कामात निष्काळजी करून दिरंगाई करणाऱ्या या दोन पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. पोलीस विभागाच्या वरिष्ठांकडून या पोलीस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.