वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:22 AM2017-07-19T01:22:27+5:302017-07-19T01:22:27+5:30
अकोट : अकोट वन्यजीव विभागांतर्गत दिवसेंदिवस वाघांची संख्या वाढत असताना सोनाळा परिक्षेत्रातील पळसकुंडी या बिटमध्ये मात्र एका वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : अकोट वन्यजीव विभागांतर्गत दिवसेंदिवस वाघांची संख्या वाढत असताना सोनाळा परिक्षेत्रातील पळसकुंडी या बिटमध्ये मात्र एका वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
पळसकुंडी बिटमध्ये १६ जुलै रोजी वन विभागाचे पथक गस्तीवर असताना एका वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच उपवनसंरक्षक पी.सी. लाकरा, सहायक वनसंरक्षक व्ही.डी. डेहनकर, मानद वन्यजीव रक्षक सावंत, देशमुख, विशाल बनसोड, मनजीतसिंग यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी फारुक यांनी घटनास्थळ गाठले. या ठिकाणी वाघाचे सर्व अवयव व कातडी जागेवरच कुजलेल्या अवस्थेत आढळून आली. या वाघाचा दोन-तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचे निष्पन्न होत असून, हा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाला असावा, असे सकृतदर्शनी दिसत असल्याचे उपवनसंरक्षक पी.सी. लाकरा यांनी स्पष्ट केले. घटनास्थळाची पाहणी व पंचनामा केल्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार विल्हेवाटीची कार्यवाही मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान वाघाचे संवर्धन व संरक्षणाकरिता केंद्र व राज्य सरकार गंभीर असताना अकोट वन्यजीव विभागाच्या परिक्षेत्रात मात्र वाघाचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. उपवनसंरक्षक पी.सी. लाकरा यांनी आपल्या कार्यालयातर्फे काढलेल्या पत्रकात वाघाचा दोन-तीन दिवसांपूर्वी निष्पन्न होत असल्याचे नमूद केले आहे.