नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या महिलेचा अखेर मृतदेह सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 04:44 PM2018-07-09T16:44:36+5:302018-07-09T16:45:02+5:30
तिचा मृतदेह उमा नदीपात्रात रोहणा पुलाच्या खाली सापडला.
मूर्तिजापूर - तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोही - लंघापूर येथील शिलाबाई अशोक मुळे ही महिला पोही गावालगत असलेल्या खरकाडी नाल्याच्या पुरात ७ जुलैला वाहून गेली होती. आज ९ जुलैचे सकाळी ११ वाजता तिचा मृतदेह उमा नदीपात्रात रोहणा पुलाच्या खाली सापडला.
दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनात संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक पिंजर शासकीय आपत्कालीन पथकाने तीन दिवस अथक शोधमोहीम राबविली,
पोही गावापासून १५ किलोमीटर उमा व पूर्णा नदीपात्रात लाईत, सेलू बोंडे, लाखपुरी सांगवी घुंगशी बॅरेजपर्यंत शोधमोहीम राबविली, येवढ्या प्रयत्नानंतर पोहीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रोहणा पुलाखाली महिलेचा मृतदेह आज ९ जुलैच्या सकाळी दिसून आला. आपत्कालीन पथक दुसरीकडे शोधात असताना रोहणा येथील प्रल्हाद बनसोड हेही महिलेचा शोध घेत होते पुलाखाली उतरले असता त्यांना तिथे दुर्गंधी आल्याने शोध घेतला असता पुलाखाली काट्यावर अडकून पडलेला मृतदेह आढळून आला.
मृतदेहाची घटनास्थळीच उत्तरीय तपासणी करण्यात आली असून मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला. अधिक तपास माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदू पाटील, पो. कॉ. विनोद तायडे, संदीप पवार, प्रवीण ठाकरे, महिला पो. कॉ. उज्ज्वला इंगोले करीत आहे.