कांदा बियाणे निघाले बोगस; बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 01:35 PM2019-01-15T13:35:07+5:302019-01-15T13:35:13+5:30
अकोला: कांदा बियाणे बोगस निघाल्याचा धक्कादायक प्रकार बार्शीटाकळी तालुक्यात उघडकीस आला असून, लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकºयांनी यासंदर्भात बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये लेखी तक्रारी देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अकोला: कांदा बियाणे बोगस निघाल्याचा धक्कादायक प्रकार बार्शीटाकळी तालुक्यात उघडकीस आला असून, लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकºयांनी यासंदर्भात बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये लेखी तक्रारी देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील शेलू येथील प्रकाश सहदेवराव काकड, रतिराम सखाराम काकड, श्रीराम रामकृष्ण काकड, शालिनी रामदास काकड या शेतकºयांनी बार्शीटाकळी येथील माउली कृषी सेवा केंद्रातून १८/१२/२०१८ रोजी कांदा बियाणे खरेदी केले. यामध्ये प्रकाश काकड यांची शेलू येथे सातबारा नंबर ४ वर, ०.३९ आर एवढी शेती असून, संपूर्ण क्षेत्रात १९/१२/२०१८ रोजी कांदा बियाण्यांची पेरणी केली. गेल्या महिनाभराच्या काळात या शेतीत एकाही ठिकाणी बियाण्यांचे अंकुर निघाले नाहीत. त्यामुळे प्रकाश काकड यांचे सुमारे ७५ ते १०० क्विंटल कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांचे किमान १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने याचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी प्रकाश काकड यांनी बार्शीटाकळी पंचायत समितीत दिलेल्या निवेदनातून केली असून जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाबीजच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, रतिराम काकड यांची १.५१ आर शेती असून, त्यांनीही हेच बियाणे लावले होते. त्यांचेही १५० ते १७५ क्विंटल कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच श्रीराम काकड यांची ०.५० आर शेती असून, त्यांचे १०० क्विंटल कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. जवळपास १ लाखाचे नुकसान झाले आहे. शालिनी काकड यांची १.० आर शेती असून, त्यांचेही १२० क्विंटल कांदा पिकाचे नुकसान झाले. १ लाखावर त्यांचेही नुकसान झाले आहे. या सर्वांनी बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये महाबीजच्या कांदा बियाण्यांच्या विरोधात तक्रार दाखल करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असून, नुकसान भरपाई न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाबीजच्या कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.