बोगस बियाण्यामुळेच हरभऱ्याला मालधारणा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:18 AM2021-02-13T04:18:53+5:302021-02-13T04:18:53+5:30
निहिदा : पिंजर परिसरात हरभरा सोंगणीला सुरुवात झाली आहे. परिसरातील लखमापूर येथील उमेश भाष्कर ढोरे यांनी साडेतीन एकरात ...
निहिदा : पिंजर परिसरात हरभरा सोंगणीला सुरुवात झाली आहे. परिसरातील लखमापूर येथील उमेश भाष्कर ढोरे यांनी साडेतीन एकरात हरभऱ्याची पेरणी केली. मात्र, हरभऱ्याला मालधारणा नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. असाच प्रकार परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या शेतातही पाहावयास मिळत असल्याने, बोगस बियाण्यांमुळेच हरभऱ्याला मालधारणा झाली नसल्याचा आरोप करीत, शुक्रवार, १२ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी पंचायत समिती कृषी कार्यालयात धडक देत तक्रार दिली.
रब्बी हंगामात पिंजर परिसरात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. लखमापूर येथील शेतकरी उमेश भाष्कर ढोरे, संतोष गोपाळराव ढोरे यांनी साडेतीन एकरात व सोनटक्के यांनी पाच एकरात हरभऱ्याची पेरणी केली. त्यानंतर, हरभरा बहरला, पण मालधारणा नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले. हरभऱ्याच्या झाडांना गाठे कमी असल्याने उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पिंजर परिसरातील लखमापूर, सावरखेड, पिंपळगाव हांडे, पारडी, आदी शिवारातही हिच स्थिती असल्याने शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्याकडे धाव घेतली. शेतकऱ्यांनी तक्रारीतून बोगस बियाण्यांमुळेच मालधारणा झाली नसल्याचा आरोप केला, तसेच या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पिंजर भागात सर्व्हे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी उमेश ढोरे, संतोष सोनटक्के, आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
----------------------------------
याबाबत माहिती मिळाली असून, लवकरच हरभरा पिकाची पाहणी करणार आहे. त्यानंतर, पुढील कारवाई करू.
- दीपक तायडे, तालुका कृषी अधिकारी बार्शीटाकळी