वऱ्हाडात कापसावर आली बोंडअळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 04:21 PM2019-08-02T16:21:37+5:302019-08-02T16:21:44+5:30
अकोला जिल्ह्यात मान्सूनपूर्व (पऱ्हाटी) कपाशीवर आतापासूनच गुलाबी बोंडअळीने चाल केली.
अकोला : पश्चिम विदर्भात (वऱ्हाड) अपेक्षित दमदार पाऊस पडला नाही; परंतु पिकांवर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात मान्सूनपूर्व (पऱ्हाटी) कपाशीवर आतापासूनच गुलाबी बोंडअळीने चाल केली असून, या अळीच्या व्यवस्थानासाठी आणखी खर्च वाढणार असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
यावर्षी पाऊस उशिरा आला असला तरी काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या संरक्षित ओलिताच्या भरवशावर मान्सूनपूर्व तर काहींनी १० जूनपर्यंत कपाशीची पेरणी केली. मान्सूनपूर्व पेरणी करणाºया शेतकऱ्यांचा आकडा १५ ते २० टक्के असून,८० टक्के शेतकºयांनी २० जूननंतर पेरणी केली आहे. ज्यांनी याअगोदर पेरणी केली, त्या पऱ्हाटीला आजमितीस फुले, पात्या डोमकळ्या आल्या आहेत. त्यावर आतापासूनच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपूर्वी बोंडअळीने विदर्भातील कपाशीचे जवळपास ४० टक्क्यांवर नुकसान केले होते. यावर्षी पुन्हा मान्सूनपूर्व कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या अळीचा प्रसार वेगाने होतो. म्हणूनच २० जूननंतर पेरणी केलेल्या कपाशीवर प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आतापासून उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.
विदर्भात यावर्षी अमरावती विभागात १० लाख ८६ हजार ६४६ तर नागपूर विभागात ६ लाख ५० हजार ५८४ हेक्टरवर एकूण १७ लाख ३७ हजार ५८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. शेतकºयांनी कपाशी पिकाला पसंती देत यावर्षी ७० हजारांवर कपाशीचे क्षेत्र वाढविले. यावर्षी पाऊस उशिरा आल्यामुळे कपाशीचे क्षेत्र वाढल्याचे सांगण्यात येत असले तरी गतवर्षी बोंडअळीवर मिळविलेले नियंत्रण व दरही चांगले मिळाल्याने शेतकºयांचा यावर्षी कपाशी पिकाकडे कल वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.अता त्यांच्यापुढे बोंडअळीचे संकट उभे ठाकले आहे.
- अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील कपाशीवर प्रदुर्भाव दिसून आला आहे. शेतकºयांनी घाबरू न जाता गुलाबी बोंडअळी दिसल्यास ते फूल, डोमकळी तोडून नष्ट करावी, प्रादुर्भाव १० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार मिश्र घटकाची फवारणी करावी.
डॉ. डी. बी. उंदीरवाडे,
विभाग प्रमुख,कीटकशास्त्र,
डॉ. पंदेकृवि, अकोला.