कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:41 PM2019-12-25T12:41:54+5:302019-12-25T12:42:06+5:30
डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून या अळीचा कपाशी पिकावर प्रकोप वाढला आहे.
अकोला : बदलते हवामान पिकावरील किडींना पोषक ठरत असून, कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रकोप वाढला आहे. तसेच उत्पादनही घटल्याने शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या कपाशी पिकावर नांगर फिरविण्यास सुरुवात केली आहे. पाण्याची व्यवस्था उपलब्ध असलेल्या ठिकाणी शेतकºयांनी रब्बी गहू पिकाची पेरणी करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी शेतकºयांना पुन्हा पैशाची तजवीज करावी लागत आहे.
विदर्भात यावर्षी १७ लाख ४९ हजार हेक्टरवर कपाशी पेरणी झाली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाला उशीर झाल्याने पेरणीला विलंब झाला. पीक वाढीच्या अवस्थेत सतत पाऊस सुरू राहिल्याने झाडांच्या मुळांना प्रकाश संश्लेषण झाले नाही. परिणामी, अन्नद्रव्याचा पुरवठा न झाल्याने त्याचा परिणाम पिकाच्या वाढीवर झाला. त्यामुळे यावर्षी कपाशीचा हंगाम एक महिना पुढे लांबला. या सर्व परिस्थितीचा या पिकावर प्रतिकूल परिणाम होत असताना सद्यस्थितीत पुन्हा पाऊस आणि सतत ढगाळ वातावरण तयार होत आहे. हे वातावरण पिकावरील कीड, रोगांना पोषक ठरत आहे. तसेच ते गुलाबी बोंडअळीला अधिकच पोषक ठरत असून, डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून या अळीचा कपाशी पिकावर प्रकोप वाढला आहे. तद्वतच उत्पादनही घटल्याने आता कपाशी नको म्हणून पश्चिम विदर्भातील शेकडो शेतकºयांनी उभ्या कपाशी पिकावर नांगर फिरविला आहे.
उशिरापर्यंत पाऊस राहिल्याने यावर्षी रब्बीचा हंगामही लांबला आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत हरभरा पेरणी करावी, अशी कृषी विद्यापीठाची शिफारस असते. यावर्षी १५ डिसेंबरपर्यंत शेतकºयांनी हरभरा पेरणी केली आहे. गहू पिकाची पेरणी १५ जानेवारीपर्यंत करण्यात येणार असल्याने कापूस उत्पादक शेतकºयांनी कपाशी पीक काढून त्या जागी गहू पीक घेण्याचे नियोजन केले आहे; परंतु ज्या शेतकºयांकडे सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे, त्यांनीच कपाशी पीक काढून रब्बी पीक घेण्यावर भर दिला आहे. यासाठी शेतकºयांना मात्र पैशाची तजवीज करावी लागत आहे.