जैव तंत्रज्ञान पद्धतीने बोंडअळीवर नियंत्रण! - डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 06:40 PM2018-09-08T18:40:53+5:302018-09-08T18:41:05+5:30
एक हजारावर गावात कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी काम करीत असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बातचीत करताना दिली.
- राजरत्न सिरसाट
अकोला : कपाशीवरील बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जैव कीड तंत्रज्ञान प्रभावी ठरत असून, या तंत्रज्ञानाच्या प्रचार, प्रसारासह प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी कृषी विद्यापीठाचे ७१ तज्ज्ञ, एक हजारावर गावात कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी काम करीत असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बातचीत करताना दिली.
प्रश्न - बोंडअळीवर नियंत्रण कसे मिळविता येते?
उत्तर- अलीकडच्या दोन वर्षांत बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त वाढला असून, बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी विविध रासायनिक कीटकनाशकांंचा अति वापर करीत असल्याने गतवर्षी शेकडो शेतकऱ्यांना विषबाधाही झाली. काही शेतकरी, शेतमजुरांचे मृत्यूही झाले. हा विषय गांभीर्याने घेत आम्ही बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणता येत असल्याने जैव कीड तंत्रज्ञानावर सूक्ष्म अभ्यास करू न हे तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक घेतले. तत्कालीन कृषी मंत्री स्व. पांडुरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यातील वरिष्ठ कृषी अधिकाºयांचे प्रशिक्षण कृषी विद्यापीठात घेण्यात आले. तसेच शासनाकडे बोंडअळी नियंत्रणासाठीचा २० कलमी कार्यक्रम पाठविण्यात आला होता.
प्रश्न- बोंडअळीवर नियंत्रण मिळविता येते का?
उत्तर- होय, नक्कीच, पण यासाठी आणखी वेळ लागेल, कुठलेही रसायन न वापरता जैव पद्धतीने बोंडअळीवर नियंत्रण मिळविता येते, हे यातून सिद्ध झाले आहे. बोंडअळीची एक पतंग जवळपास २५० ते ३०० अंडी एकाच वेळी टाकते. त्यातून अळी बाहेर येते. ही अळीच कपाशीचे नुकसान करते. जैव कीड हे पतंगच नष्ट करण्याचे काम करते.
प्रश्न- काय आहे जैव कीड तंत्रज्ञान?
उत्तर- विषमुक्त अन्नासाठी जैव कीड हे अत्यंत महत्त्वाचे तंत्रज्ञान असून, या तंत्रज्ञानाच्या वापराने बोंडअळीवर नियंत्रण मिळवता येते.ट्रायकोकार्ड, निंबोळी अर्क हा या तंत्रज्ञाचा भाग आहे.
प्रश्न- २० कलमी कार्यक्रमामध्ये काय होेते?
उत्तर- यामध्ये शेतकºयांनी फरदड कापूस घेऊ नये, मान्सूनपूर्व कपाशीची लागवड करू नये, यावर भर देण्यात आला होता. बोंडअळी येण्याची ही दोन महत्त्वाची दोन कारणे आहेत. यावर्षी म्हणूनच फरदड कापूस घेऊ नये, यासाठीचे मार्गदर्शन शेतकºयांना करण्यात आले. मान्सूनपूर्व कपाशीवर बोंडअळी येत असल्याने यावर्षी याविषयी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले, तसेच मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी टाळण्यासाठी कंपन्यांना बियाणे विक्रीसाठीची मुदत यावर्षी २० मे देण्यात आली होती.
प्रश्न- या तंत्रज्ञानाने बोंडअळी पूर्ण नष्ट होईल का?
उत्तर- एकदम नष्ट होणार नाही, बोंडअळी एक-एक पिढी नष्ट करता येते. त्यासाठीच हे तंत्रज्ञान शेतकºयांना समजावून सांगितले जात आहे. शेतकºयांचे मेळावे घेण्यात आले. कृषी विद्यापीठाचे ७१ च्यावर शास्त्रज्ञ गावोगावी हे काम करीत असून, एक हजारावर गावात एक हजार विद्यार्थ्यांमार्फत शेतकºयांना जैव कीड तंत्रज्ञानाची माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचवली जात आहे. याकरिता कृषी विभागाचे सहकार्य महत्त्वाचे ठरत आहे. यावर्षी पाच ते दहा टक्के क्षेत्रावर बोंडअळी आहे. या तंत्रज्ञानामुळे त्यावरही नियंत्रण मिळविता येईल. बोंडअळीच्या पतंगाने अंडीच टाकू नये, यासाठी हे तंत्रज्ञान प्रभावी ठरत आहे.
प्रश्न- कपाशी पिकापुरतेच हे तंत्रज्ञान आहे का?
उत्तर- यावर्षी कपाशी पिकावरील बोंडअळीचे नियंत्रण यावरच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यासंदर्भात चळवळ उभारण्यात आली आहे; पण असे असले तरी भातावरील खोड किडींचे नियंत्रण जैव पद्धतीने करण्यात आले आहे. रस शोषण करणाºया किडींचा शेतात पिवळ्या पट्ट्या लावल्याने नियंत्रण मिळविता येते. शेतकरी आता या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत.पुढच्यावर्षी सर्वंच पिकांवर हे तंत्रज्ञान वापरणार आहोत.
प्रश्न- नवे तंत्रज्ञान कोणते?
उत्तर - सौर ऊर्जेवरील कीटकनाशक सापळे तयार करण्यात आले असून, एका हेक्टरवर एक सापळा लावता येतो. या सापळ्याचे आयुष्य सात ते आठ वर्षे आहे. यामुळे बोंडअळीचे प्रभावी नियंत्रण करता येते. शेतकºयांना मुबलक प्रमाणात हे सापळे उपलब्ध व्हावेत, यासाठी एका खासगी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे.
प्रश्न- बोंडअळीने होणारे नुकसान किती?
उत्तर- बोंडअळीमुळे कपाशीचे सर्वात जास्त नुकसान होते. विशेष म्हणजे, शेतकºयांचा फवारण्याचा आर्थिक खर्च साठ ते सत्तर टक्के होतो. उत्पादन त्या तुलनेत कमी होत असल्याने शेतकरी हवालदिल होत असल्याचे आपण पाहत आहोतच.
प्रश्न- सेंद्रिय पद्धतीचा हा वापर आहे का?
उत्तर- विषमुक्त अन्नासाठी कृषी विद्यापीठाने सेंद्रिय शेतमाल उत्पादनावर भर दिलेला असून, दहा वर्षांपासून येथे काम सुरू आहे. कमी खर्चात शाश्वत शेती हा यामागचा उद्देश आहे. यासाठीच शासनाने या विषयावरील प्रयोगशाळा कृषी विद्यापीठाला देऊ केली आहे. या प्रयोगशाळेत जैव कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय शेती संशोधन केले जाणार आहे.