विदर्भात बोंडअळीचे नवे हॉटस्पॉट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 11:15 AM2020-10-31T11:15:30+5:302020-10-31T11:19:09+5:30
Agriculture, Bollworm on Cotton वातावरणातील बदल पोषक ठरत असल्याने गत आठवडाभरात बोंडअळी प्रादुर्भावाचे काही नवे हॉटस्पॉट दिसून आले.
अकोला : मध्यंतरी वर्धा जिल्हा वगळता विदर्भात कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात होता; मात्र हवामान बदलामुळे गत आठवड्यात बोंडअळी प्रादुर्भावाचे नवे हॉटस्पॉट दिसून येत आहेत. आतापर्यंत अकोल्यानंतर वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त होता; पण आता नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी भागातही बोंडअळीने अटॅक केल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. विदर्भात अकोल्यासह वर्धा, यवतमाळ, अमरावती या भागात कपाशीवर बोंडअळीचा जास्त प्रादुर्भाव होता. मध्यंतरी त्यावर करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे काही प्रमाणात यावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले होते; मात्र वातावरणातील बदल बोंडअळीसाठी पोषक ठरत असल्याने गत आठवडाभरात बोंडअळी प्रादुर्भावाचे काही नवे हॉटस्पॉट दिसून आले. आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातील आष्टी परिसरात ५० ते ६० टक्के बोंडअळीचा प्रादुर्भाव होता. कृषी तज्ज्ञांच्या मते डिसेंबरपर्यंत हा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात काही भागात दिसू लागली असून, विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती अकोला या जिल्ह्यांमध्ये बोंडअळीचे काही नवे हॉटस्पॉट आढळून येत असल्याची माहिती कृषी तज्ज्ञांनी सांगितली.
हे आहेत नवे हॉटस्पाॅट
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव पुन्हा दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने सांंगवी आणि हिवरखेड, चितलवाडी या भागात ७० ते ८० टक्के प्रादुर्भाव दिसून येत आहे. या शिवाय, अमरावती जिल्ह्यातील नांदुरा, किरक्टे, नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी तसेच वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
गत आठवडाभरात विदर्भात काही नवीन भागात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.
- डॉ. डी. उंदीरवाडे, विभागप्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पीडीकेव्ही, अकोला.