हाडांच्या ठिसुळतेमुळे वाढतोय ‘आॅस्टियोपोरोसिस’चा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 02:50 PM2019-10-20T14:50:04+5:302019-10-20T14:50:21+5:30
डॉक्टरांच्या सल्ल्याने हाडांची नियमित तपासणी करा.
अकोला : कॅल्शिअम व खनिजांच्या अभावामुळे हाडांच्या ठिसुळतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढू लागले आहे. हाडांच्या ठिसुळतेमुळे ‘आॅस्टियोपोरोसिस’ या आजाराचा धोका वाढला आहे. ही समस्या प्रामुख्याने वयाच्या चाळिशीनंतर अनेकांना त्रस्त करीत असल्याने वेळीच सावध होण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे खानपान आणि व्यायामाकडे प्रत्येकाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेकांच्या शरीरात ‘कॅल्शिअम’ आणि व्हिटॅमिन डी’ची कमी उद्भवू लागली आहे.
सामान्यपणे ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या रुग्णांकडून सांध्यांमध्ये वेदना आणि कडकपणा आल्याची तक्रार केली जाते. हालचाल केली की ती वाढते आणि विश्रांती घेतली की कमी होते. ‘आॅस्टियोपोरोसिस’ हा आजार लवकर दिसून न येणारा आजार आहे; मात्र हाडांची ठिसुळता वाढल्यावरच त्याची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे निदान लवकर होत नाही. वयाची चाळिशी ओलांडलेल्या महिला व पुरुषांमध्ये हात-पाय दुखण्याचे प्रमुख कारण म्हणजे ‘आॅस्टियोपोरोसिस’ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे खानपान आणि व्यायामाला प्राधान्य देऊन हाडांची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टर करतात. शरीरात ‘कॅल्शिअम’ आणि व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे ‘आॅस्टियोपोरोसिस’चा धोका वाढतो. त्यामुळे ‘कॅल्शिअम’ आणि व्हिटॅमिन डी’युक्त आहार सेवन करण्याचा सल्लाडी तज्ज्ञ डॉक्टर देतात.
ही आहेत कारणे
- ‘कॅल्शियम’ व ‘व्हिटॅमिन डी’ची कमी
- थायरॉइडची समस्या एस्ट्रोजन
- हार्मोन्सची कमतरता किंवा बॅलन्स बिघडणे
- शारीरिक हालचालींची, व्यायामाचा अभाव
- अयोग्य आहार
ही आहेत लक्षणे...
- हाताचे हाड, कंबर आणि खांदे दुखणे ही प्राथमिक लक्षणे सांगितली जातात.
- प्रमुख लक्षणे हाडांना फ्रॅ क्चर झाल्यानंतरच दिसून येतात.
- मनुष्याची हाडे मजबूत असल्याने सहज मोडत नाहीत;
- मात्र या आजारामुळे ठिसूळ झालेली हाडे लवकर मोडतात.
हे करा...
- सकाळचे कोवळे ऊन घ्या.
- मासे, दूध नियमित घ्या.
- नियमित व्यायाम करा.
- गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घ्या.
आॅस्टियोपोरोसिस म्हणजेच हाडांच्या ठिसुळतेची लक्षणे सहजासहजी दिसून येत नाहीत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने हाडांची नियमित तपासणी करा. तसेच कॅल्शिअम व व्हिटॅमिन डी युक्त आहार आणि नियमित व्यायाम करा.
- डॉ. अमोल रावणकर, अस्थिरोग तज्ज्ञ, अकोला