अकोल्यातील २५ वर बुकींचा छत्तीसगढमध्ये ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 01:14 PM2018-12-09T13:14:24+5:302018-12-09T13:14:32+5:30
अकोला: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यातील निवडणुकीत शुक्रवारी मतदान प्रक्रिया आटोपताच अकोल्यातील सट्टा माफियांनी (बुकींनी) थेट छत्तीसगढ गाठून या पाचही राज्यातील सत्तेसह, बड्या राजकीय नेत्यांच्या जय-पराजयावर कोट्यवधी रुपयांचा सट्टाबाजार सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
- सचिन राऊत
अकोला: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यातील निवडणुकीत शुक्रवारी मतदान प्रक्रिया आटोपताच अकोल्यातील सट्टा माफियांनी (बुकींनी) थेट छत्तीसगढ गाठून या पाचही राज्यातील सत्तेसह, बड्या राजकीय नेत्यांच्या जय-पराजयावर कोट्यवधी रुपयांचा सट्टाबाजार सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
देशातील सट्टाबाजारामध्ये अकोल्यातील सट्टा माफियांचे कुप्रसिद्ध असे मोठे नाव आहे. क्रिकेट, सोन्यासह दागिन्यांचे रोजचे भाव, पाऊस व निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येतो. यामध्ये अकोल्यातील सट्टा माफिया प्रत्येक वेळी प्रचंड सक्रिय होत असल्याचे वास्तव आहे. देशातील पाच राज्यातील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर मंगळवारी निकाल जाहीर होणार आहेत; मात्र हे निकाल येण्यापूर्वी पाच राज्यातील सत्ता आणि भाजपा, काँगे्रस, टीआरएसएच आणि मिझो नॅशनल फ्रंटच्या बड्या नेत्यांच्या विजय आणि पराभवावर कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावण्यात येत आहे. यासाठी अकोल्यातील बड्या बुकींची एक टीमच छत्तीसगढमधील रायपूर आणि आणखी एका शहरात दाखल झाली असून, त्यांनी यामध्ये कोट्यवधी रुपयांची बुकिंग घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये ‘मामा’, एका औषधी प्रतिष्ठान संचालकाचा भाऊ, ‘जय माता दी’ प्रचलीत असलेल्या गृपमधील पाच ते सहा सट्टामाफीया, कापड व्यवसायात उतरलेला माफीया, ‘कल्ल्या’, बोरगाव मंजूतील छाप्यात सापडलेला ‘गिरीश’ यांच्यासह २५ सट्टा माफिया छत्तीसगढमध्ये ठिय्या मांडून सट्टा बाजार चालवित असल्याची माहिती आहे. यामध्ये अकोल्यातील अनेकांनी सट्टा लावल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, यामधील बहुतांश माफिया हे अकोला पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील असल्याचेही वास्तव आहे.
या नेत्यांवर लागला अधिक सट्टा
मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान, कमलनाथ, राजस्थानच्या वसुंधरा राजे, सचिन पायलट, अशोकसिंह गहलोत, तेलंगणाचे चंद्रशेखर राव, जगदीश रेड्डी, रामा राव, छत्तीसगढमध्ये रमण सिंह यांच्यासह मिझोरमधील काही बड्या दिग्गज नेत्यांच्या जय-पराजयावर कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावण्यात आला आहे.
सट्टा माफियांकडे पोलिसांचे दुर्लक्ष
तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या धाकापोटीच सट्टा माफियांनी हा गोरखधंदा अकोल्यातून गुंडाळत वाशिममध्ये सुरू केला होता; मात्र मीणा यांनी वाशिम पोलिसांना सोबत घेऊन सदर सट्टा माफियांना वाशिम शहरातून अटक केली होती; मात्र त्यानंतर सट्टा माफियांकडे अकोला पोलिसांची पूर्णत: डोळेझाक असून, पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.