लग्न सराईसाठी महापालिकेच्या शाळांची ‘बुकिंग’; शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 02:07 PM2018-05-03T14:07:50+5:302018-05-03T14:07:50+5:30
अकोला : महापालिकेच्या शाळांमधील शालेय कामकाज ३० एप्रिल रोजी आटोपताच काही शाळेच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लग्न सराईसाठी मनपाच्या शाळांची ‘बुकिंग’ सुरू केली आहे.
अकोला : महापालिकेच्या शाळांमधील शालेय कामकाज ३० एप्रिल रोजी आटोपताच काही शाळेच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लग्न सराईसाठी मनपाच्या शाळांची ‘बुकिंग’ सुरू केली आहे. लग्न समारंभ असो वा इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी मनपाच्या शाळा भाडेतत्त्वावर देता येत नसताना, स्लम एरियातील शाळा परस्पर भाड्याने देण्यासाठी काही मुख्याध्यापक सरसावल्याची माहिती समोर आली आहे.
चार वर्षांपूर्वी लग्न समारंभ असो वा शुभ कार्यासाठी महापालिकेच्या शाळा सर्रासपणे भाडेतत्त्वावर दिल्या जात होत्या. त्याबदल्यात संबंधित आयोजकांना नाममात्र चार ते पाच हजार रुपये शुल्क आकारल्या जात होते. संबंधित शाळेतील सहा ते सात वर्ग खोल्या, विद्युत व्यवस्था, पाणी पुरवठा तसेच मंडपासाठी खुल्या मैदानाची सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे गरजू नागरिक मनपा शाळेला पसंती देत असल्याचे चित्र होते. परंतु, मनपाला मिळालेल्या अत्यल्प शुल्काच्या बदल्यात वर्ग खोल्यांसह परिसराची स्वच्छता राखली जात नसल्याचे मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आले. शाळेतील विद्युत व्यवस्थेसह पाण्याचा बेसुमार वापर, वर्ग खोलीतील भिंतींवर नसत्या उठाठेवी करणे, परिसरात अस्वच्छता पसरविणे, आवारभिंतीचे नुकसान करणे तसेच दिवाळीच्या सुट्यांमध्ये सुद्धा शाळा भाडेतत्त्वावर मिळवण्यासाठी प्रशासनावर दबावतंत्राचा वापर करणे आदी प्रकार होत असल्यामुळे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी मनपाच्या शाळा भाडेतत्त्वावर न देण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन आयुक्त लहाने यांची बदली होताच व शिक्षण विभागाचा कारभार हवेत सुरू असल्याचे निदर्शनास येताच, काही शाळांमधील मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाºयांनी लग्न समारंभासाठी शाळांची आगाऊ ‘बुकिंग’ सुरू केल्याची माहिती आहे. या प्रकाराची मनपाच्या शिक्षण विभागाला खबरबात नसेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महापालिकेचा आदेश बासनात
मनपा शाळेत पार पडणाºया कार्यक्रमांमुळे इमारतींचे व शाळा परिसराचे प्रचंड नुकसान होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी १९ नोव्हेंबर २०१६ रोजी मनपाच्या शाळा भाडेतत्त्वावर न देण्याचा आदेश जारी केला. हा आदेश काही मुख्याध्यापकांसह शाळा व्यवस्थापन समित्यांनी बासनात गुंडाळून ठेवल्याचे चित्र आहे. या प्रकरणी शिक्षण विभाग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एजंटमार्फत बुकिंग
मनपाच्या शाळा भाडेतत्त्वावर देण्यात प्रामुख्याने उर्दू शाळा अग्रेसर असल्याचे चित्र आहे. यामध्ये नायगाव, अकोट फैल, देशमुख फैल, तार फैल, लक्कडगंज, माळीपुरा, सिंधी कॅम्प, खदान, रामदासपेठ, ताजनापेठ, भांडपुरा आदी परिसरातील शाळांमध्ये उन्हाळ््याच्या सुट्यात सर्रास कार्यक्रमांची रेलचेल राहत होती. संबंधित शाळा भाडेतत्त्वावर देताना मुख्याध्यापक किंवा शाळा व्यवस्थापन समितीला अडचण ठरणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली असून, शाळेची नोंदणी करण्यासाठी एजंटची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. कार्यक्रम कोणत्याही अडथळ््याविना पार पाडण्याची जबाबदारी सर्वस्वी आयोजकांवर सोपविण्यात आली आहे.