‘कांगारू मदर युनिट’ ठरतेय बालकांसाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:59 AM2017-10-05T01:59:59+5:302017-10-05T02:00:21+5:30
अकोला : कमी दिवसांची, कमी वजनाची व गुंतागुंतीच्या प्रसूतीतून जन्मलेल्या बालकांचे प्राण वाचविण्यासाठी येथील जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात अलीकडेच ‘कांगारू मदर केअर युनिट’ (केएमसी) सुरू करण्यात आले असून, हा कक्ष स्थापन झाल्यापासून अर्भक मृत्यूदर नियंत्रित होण्यास मदत मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कमी दिवसांची, कमी वजनाची व गुंतागुंतीच्या प्रसूतीतून जन्मलेल्या बालकांचे प्राण वाचविण्यासाठी येथील जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात अलीकडेच ‘कांगारू मदर केअर युनिट’ (केएमसी) सुरू करण्यात आले असून, हा कक्ष स्थापन झाल्यापासून अर्भक मृत्यूदर नियंत्रित होण्यास मदत मिळाली आहे.
अर्भकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या आहेत. जन्माच्या वेळची परिस्थिती आणि इतर कारणांमुळे नवजात बालकांच्या जीवाला होणारा धोका टळावा, बाळ आणि बाळंतिणीला गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देता यावी, यासाठी राज्यातील सर्वच जिल्हा स्त्री रुग्णालयांमध्ये ‘कांगारू मदर केअर युनिट’ सुरू करण्यात आले असून, याचाच एक भाग म्हणून येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात कांगारू मदर केअर युनिटची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी विशेष कक्ष उघडण्यात आला असून, त्यामध्ये आराम (रिक्लायनिंग) खुच्र्यांची तसेच खाटांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी एकांत आणि सुरक्षितता याची विशेष काळजी घेण्यात आली असून, कक्षातील कार्यप्रणालीसाठी नियमावलीही (प्रोटोकॉल) बनविण्यात आली आहे. या विशेष कक्षात कार्यरत सर्वच कर्मचार्यांना केएमसीचे प्रशिक्षण देण्यात आले असून, या कक्षात २४ तास सेवा आणि बालकांकडे लक्ष देण्यासोबतच मातांना समुपदेशन करून त्यांना आधार आणि मार्गदर्शन करण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
काय आहे ‘केएमसी’?
कांगारू मदर केअर युनिट ही कमी खर्चिक आणि जास्त फायद्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. यामध्ये कमी वजनाच्या बालकांचे योग्यप्रकारे संगोपन करून त्यांना लागणारी सर्व काळजी घेतानाच मातेकडून परिपूर्ण स्तनपानही दिले जाते. यामुळे जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त प्रमाणात कमी वजनाच्या म्हणजेच दोन हजार ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या बालकांचे मृत्यू टाळण्यास मदत होते. या युनिटमुळे बाळाचे तापमान स्थिर राहते, बाळाला स्तनपानासाठी प्रोत्साहन मिळते आणि विशेष म्हणजे जंतुसंसर्गापासून त्याचा बचाव होतो.
बालकाची प्रकृती लवकरात लवकर स्थिर होऊन बालकाची मानसिक वाढही होते. १८00 ग्रॅमपेक्षा जास्त आणि २५00 ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या व प्रकृती स्थिर असणार्या बालकांना जन्मानंतर लगेच केएमसी देणे योग्य ठरते. १२00 ग्रॅमपेक्षा जास्त आणि १८00 ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या बालकांना सुरुवातीच्या काळात काही समस्या असतात. त्यांना केएमसी देण्यापूर्वी एसएनसीयूमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जातात.
कमी वजनाच्या, कमी दिवसांच्या किंवा जंतुसंसर्ग झालेल्या नवजात शिशूंसाठी ‘केएमसी’ एक वरदानच ठरले आहे. युनिटमुळे बाळाचे तापमान स्थिर राहते, बाळाला स्तनपानासाठी प्रोत्साहन मिळते आणि जंतुसंसर्गापासून त्याचा बचाव होतो.
- डॉ. आरती कुलवाल,
वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.